कळंबोली : अवघ्या तीन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारपेठ सजल्या आहेत. खरेदीसाठी भक्तांची झुंबड होत आहे. तर प्रशासकीय यंत्रणाही बंदोबस्तासाठी सज्ज झाली आहे. पनवेल-सायन महामार्ग तसेच मुंबई-गोवा महामार्गावर यासाठी विशेष तयारी सुरू आहे. कोकणातील गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना वाहतूक पोलिसांनी हाती घेतल्या आहेत.
मुंबई येथून नऊ लाखांच्या जवळपास चाकरमानी कोकणात प्रवास करीत असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होते. वाहतूककोंडी बरोबरच अपघाताचीही शक्यता नाकारता येत नाही. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता कळंबोली वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कळंबोली वाहतूक शाखेकडून खारघर टोलनाकापासून ते कळंबोली सर्कलपर्यंत सूचना फलक लावण्यात आले आहेत, तसेच कळंबोली सर्कल ते डी पॉइंटपासून पळस्पे फाट्यापर्यंत चालकाकरिता दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. गणेशोत्सवात सुरुवातीचे चार दिवस कळंबोली सर्कल येथे वाहनांचा अतिरिक्त ताण येतो. वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे येथे विशेष खबरदारी घेण्यात आली आहे, याकरिता बाहेरील मनुष्यबळही मागवण्यात आले आहे.
कळंबोली सर्कल, पळस्पे फाटा या ठिकाणी नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर कळंबोली सर्कल येथे चार मोठ्या क्रेन तर पाच टोइंग बेल्टची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. कळंबोली ते पळस्पे फाटा दरम्यान दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. महामार्गावर तळोजा उड्डाणपूल, कामोठे उड्डाणपूल, कळंबोली मॅकडॉनल्ड, कळंबोली सर्कल, डी पॉइंट, पळस्पे फाटा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.वाहतुकीवर सीसीटीव्हीची नजरच्गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्याकरिता कळंबोली सर्कल, पळस्पे फाटा आणि खारपाडा येथे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याचे नियंत्रण वाहतूक पोलिसांकडे असणार आहे, तर यामुळे वाहतूक नियमन व्यवस्थित होणार असल्याचा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. ठिकठिकाणी सूचना तसेच दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. कळंबोली सर्कल येथे मोठ्या प्रमाणात वाहने येतात. वाहतूककोंडी होती, त्यामुळे या ठिकाणी विशेष खबरदारी घेतली आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- अंकुश खेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, कळंबोली