डम्परमधून क्षमतेपेक्षा अधिक बांधकाम साहित्यांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:25 AM2020-01-14T00:25:39+5:302020-01-14T00:25:51+5:30
मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या कामासाठी उरण आणि पनवेल परिसरातील दगडखाणीतून खडी पुरविली जाते.
नवी मुंबई : नियम धाब्यावर बसवून डम्परमधून क्षमतेपेक्षा अधिक बांधकाम साहित्य वाहून नेले जात आहे. विशेष म्हणजे, पनवेल व उरण येथून येणारे ओव्हर लोडेल डम्पर सायन-पनवेल महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जात असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडीसह अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. या कामासाठी उरण आणि पनवेल परिसरातील दगडखाणीतून खडी पुरविली जाते. ही खडी पुरविण्यासाठी शेकडो डम्पर दिवसरात्र मुंबईच्या दिशेने धावताना दिसतात. असे असले तरी या डम्पर चालकांकडून माल वाहून नेण्यासंदर्भातील सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत. डम्परमध्ये क्षमतेपेक्षा अधिक खड्डी व रेती भरली जाते. डम्परमध्ये काठोकाठ भरलेली खडी व रेती रस्त्यावर सांडली जात असल्याने सुसाट धावणाऱ्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियमानुसार खडी आणि रेतीची वाहतूक करताना ती रस्त्यावर सांडू नये, यासाठी त्यावर ताडपत्री टाकण्याच्या सूचना आहेत. मात्र, अनेक डम्पर चालक या सूचनेलासुद्धा केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून आले आहे.
डम्पर चालकांच्या या मनमानीला आरटीओचे अर्थपूर्ण अभय असल्याचा आरोप केला जात आहे. बांधकाम साहित्य घेऊन जाणाºया डम्परला रात्री आठ नंतरच मुंबईत प्रवेश दिला जातो. त्यामुळे उरण व पनवेलमधून निघालेले ओव्हर लोडेड डम्पर सायन-पनवेल महामार्गावर टप्प्या-टप्प्यावर उभे असलेले पाहावयास मिळतात. त्यामुळेसुद्धा अपघाताला निमंत्रण मिळत असल्याच्या वाहनधारकांच्या तक्रारी आहेत.