ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूककोंडी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:31 AM2018-05-26T03:31:54+5:302018-05-26T03:31:54+5:30
रबाळेमध्ये चक्काजाम : तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर नवीन पुलाची गरज
नवी मुंबई : दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्गाचे बांधकाम केल्यानंतरही ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूककोंडी जैसे थे आहे. रबाळे उड्डाणपुलावरही चक्काजाम होऊ लागले आहे. सर्वात गंभीर स्थिती तुर्भे स्टोअर्सजवळ असून तेथे नवीन उड्डाणपूल बांधल्याशिवाय कोंडी सुटणार नाही.
नवी मुंबईमधील सर्वाधिक वाहतूक असणाऱ्या रोडमध्ये ठाणे- बेलापूरचाही समावेश आहे. राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत या परिसरामध्ये आहे. याशिवाय ठाणे व मुलुंडसह कल्याणकडे जाणारी वाहने या रोडवरून जात असतात. वारंवार होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शासनाने एमएमआरडीएच्या माध्यमातून घणसोली ते तळवली दरम्यान १४५१ मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला आहे.सविता केमिकलजवळ ५७६ मीटर लांबीचा उड्डाणपूल व महापे येथे भुयारी मार्गाचे काम केले आहे. तब्बल १५५ कोटी रूपये खर्च करून हे तीन प्रकल्प सुरू केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामांचे लोकार्पण केले आहे. परंतु यानंतरही ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूककोंडी अद्याप संपलेली नाही. सकाळी व सायंकाळी वर्दळीच्या वेळी पुन्हा चक्काजामची स्थिती होवू लागली आहे. घणसोली ते तळवली उड्डाणपुलावरून उतरल्यानंतर रबाळे रेल्वे स्टेशन ते पोलीस चौकीजवळ रोड अरूंद असल्याने वाहतूककोंडी होवू लागली आहे. गुरूवारी रात्री नवीन पुलावरही चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. ऐरोली कटई मार्गाचे काम होईपर्यंत या मार्गावरील कोंडी थांबणार नाही.
ठाणे-बेलापूर रोडवर सर्वात गंभीर स्थिती तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर आहे. एमआयडीसीमध्ये जाणारे १ लाख पेक्षा जास्त कामगार व परिसरातील नागरिक या स्टेशनमधून ये-जा करत असतात. या सर्वांना रोड ओलांडून एमआयडीसीमध्ये व तुभे स्टोअर्स व नाक्याकडे जावे लागत आहे. यामुळे याठिकाणी २४ तास वाहतूककोंडी होत असते.
सकाळी व सायंकाळी वाहतूक जवळपास ठप्प होते. रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्यता वाढू लागली आहे. सीबीडी ते ऐरोली दरम्यान महामार्ग व ठाणे- बेलापूर रोडवर भुयारी मार्ग व स्काय वॉकचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. १२ उड्डाणपूल, एक भुयारी मार्ग, तीन स्कायवॉक तयार केले आहेत. परंतु महामार्गावरील अनधिकृत बसथांबे, तुर्भे नाक्यावरील अतिक्रमण, तुर्भे स्टोअर्ससमोर उड्डाणपूल नसल्यामुळे वाहतूककोंडी होवू लागली आहे.
याविषयी आताच ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात पुन्हा वाहतूक समस्या गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
१२ उड्डाणपुलांचे जाळे
सीबीडी ते ऐरोली दरम्यान महामार्गासह ठाणे-बेलापूर रोडवर तब्बल १२ उड्डाणपुलांचे जाळे आहे. सीबीडी, उरण फाटा, नेरूळ, शिरवणे, सानपाडा, तुर्भे, पावणे, सविता केमिकल, कोपरखैरणे रेल्वे स्टेशन, घणसोली रेल्वे स्टेशन, तळवली,रबाळे पोलीस स्टेशन असे एकूण १२ उड्डाणपूल या मार्गावर उभारण्यात आले असून अजून तुर्भे रेल्वे स्टेशनसमोरही उड्डाणपुलाची गरज आहे.
स्कायवॉकसह भुयारी मार्ग
या मार्गावर सानपाडा, तुर्भे नाका,कोपरखैरणे, खैरणे, रबाळे रेल्वे स्टेशन, चिंचपाडा जवळ स्काय वॉक उभारण्यात आला असून लोकमत प्रेसजवळ भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे.