पोलिसांसह महापालिकेमुळे सानपाडामध्ये झाली वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 01:49 AM2018-06-07T01:49:57+5:302018-06-07T01:49:57+5:30
सानपाडामध्ये सायन-पनवेल महामार्गाला समांतर असणाऱ्या रोडवर पोलीस व महापालिकेमुळे वाहतूक समस्या वाढली आहे. दत्तमंदिरकडे जाणा-या रोडवर एक बाजूला ‘नो पार्किंग’ व दुस-या बाजूला ‘पे अॅण्ड पार्क’चा फलक लावण्यात आला आहे.
नवी मुंबई : सानपाडामध्ये सायन-पनवेल महामार्गाला समांतर असणाऱ्या रोडवर पोलीस व महापालिकेमुळे वाहतूक समस्या वाढली आहे. दत्तमंदिरकडे जाणा-या रोडवर एक बाजूला ‘नो पार्किंग’ व दुसºया बाजूला ‘पे अॅण्ड पार्क’चा फलक लावण्यात आला आहे. चुकीच्या पद्धतीने लावलेल्या फलकांमुळे वाहतुकीची समस्या वाढली असून, नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
शहरामधील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे; परंतु दोन्ही संस्थांच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक ठिकाणी समस्या सुटण्याऐवजी वाढू लागली असून, यामध्ये सानपाडा दत्तमंदिर रोडचाही समावेश आहे. सायन-पनवेल महामार्गाला लागून रेल्वे स्टेशनकडून मंदिराकडे जाणारा समांतर रस्ता बनविला आहे. या परिसरामध्ये पृथ्वी पार्क व बाजूच्या इमारतीमध्ये बँकेसह इतर व्यावसायिक गाळे असून निवासी संकूल आहेत. निवासी संकुलामधील व या परिसरातील वाहन विक्रीचा व्यवसाय करणाºयांची वाहने रोडच्या एका बाजूला उभी केली जात होती. एक बाजूला वाहने उभी राहत असल्यामुळे वाहतूककोंडी होत नव्हती.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सूचना व हरकती न घेता, वास्तव स्थितीचा विचार न करता, ज्या बाजूला वाहने पार्किंग करणे आवश्यक आहे त्या बाजूला नो पार्किंगचे फलक लावले आहेत. ज्या बाजूला वाहने उभी करणे सुरक्षित नाही व वाहतुकीसाठी योग्यही नाही त्या बाजूला पे अॅण्ड पार्कचे फलक लावले आहेत. वास्तविक पे अॅण्ड पार्कला या परिसरामध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेली नाही. पे अॅण्ड पार्क प्रत्यक्षात सुरूही केलेले नसून, ते सुरू करणे वाहतुकीसाठी योग्यही होणार नाही; परंतु या दोन्ही फलकांमुळे वाहनधारक संभ्रमात आहेत. पूर्वी एक बाजूला वाहने उभी केली जात होती. आता दोन्ही बाजूला वाहने उभी राहत असून, त्यामुळे वाहतूककोंडी वाढली आहे.
वाहतूक पोलीस व महापालिकेने चुकीच्या पद्धतीने फलक लावले आहेत. यामुळे वाहतूककोंडी वाढली आहे. पे अॅण्ड पार्कचे बोर्ड काढण्यात यावेत व नो पार्किंगचे फलक काढून त्या ठिकाणी पार्किंगचे फलक लावण्यात यावेत.
- अरुण शिंदे, वाहनधारक
दत्तमंदिर रोडवर नो पार्किंगचे फलक लावलेल्या बाजूलाच वाहने उभी करणे सुरक्षित आहे. पे अॅण्ड पार्कच्या बाजूला नो पार्किंगचे बोर्ड लावण्याची गरज आहे. पूर्वीप्रमाणे व्यवस्था न केल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.
- सचिन पवार, रहिवासी, सानपाडा