पनवेल : सिडकोच्या ‘नैना’ प्रकल्पात २२४ गावांचा समावेश आहे. त्यापैकी पनवेल तालुक्यातील २३ गावांच्या पायलट प्रोजेक्टवर ‘नैना’ प्राधिकरणाने काम सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच, या क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे, असे असले तरी या क्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न सिडकोसाठी डोकेदुखीचा ठरला आहे. या बांधकामांना आळा घालण्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही, त्यामुळे दिवसाआड विनापरवाना बांधकामे उभारली जात आहेत. अनियंत्रितपणे वाढणाºया या बांधकामामुळे ‘नैना’चे भविष्यकालीन नियोजन ढासळण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
‘नैना’ क्षेत्रातील २२४ गावांपैकी २३ गावांचा विकास नगरपरियोजना (टाउन प्लॅनिंग स्कीम) अंतर्गत केला जाणार आहे, त्यानुसार आतापर्यंत दोन टीपी स्कीमला मंजुरी देण्यात आली आहे. पुढील दीड-दोन वर्षांत पहिल्या टप्प्याचा विकास पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर ‘नैना’च्या उर्वरित म्हणजेच २०१ गावांच्या विकासावर भर दिला जाणार आहे, असे असले तरी सिडकोच्या या नियोजनाला अनधिकृत बांधकामांचा अडथळा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संपूर्ण ‘नैना’ क्षेत्राच्या विस्तीर्ण भूभागातील अतिक्रमणे व बेकायदा बांधकामे नियंत्रणात आणताना सिडकोची दमछाक होताना दिसत आहे. या कामासाठी सिडकोकडे असलेली यंत्रणा त्रोटक व अपुरी आहे. सध्याच्या घडीला या विभागात चार सर्वेअर, चार अनधिकृत बांधकाम नियंत्रक, तसेच सहा कार्यालयीन कर्मचारी असा अवघ्या १४ लोकांचा स्टाफ आहे. या तुटपुंज्या कर्मचारी वर्गावर ‘नैना’च्या ३७ कि.मी. क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचे नियंत्रण करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे, त्यामुळे या विभागाच्या कामाला मर्यादा पडल्या आहेत.बजेटमधील घरांच्या नावाने फसवणूकपनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात खासगी विकासकांनी मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले आहेत. परवडणारी घरे अशी जाहिरातबाजी करून मध्यमवर्गीय कुटुंबांना आकर्षित केले आहे. विशेष म्हणजे, या क्षेत्रात उभारत असलेल्या अनेक गृहप्रकल्पांना सिडकोच्या ‘नैना’ प्राधिकरणाची परवानगी नाही, त्यामुळे अशा गृहप्रकल्पांत गुंतवणूक केलेले शेकडो चाकरमानी धास्तावले आहेत.सध्याच्या घडीला ‘नैना’ प्रकल्पातील तीन स्कीम मंजूर झालेल्या आहेत. दोन स्कीम दोन महिन्यांत मंजूर होतील. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर त्वरित रस्त्यांच्या कामाला सुरु वात केली जाणार आहे. आराखड्यानुसार ‘नैना’ क्षेत्र विकसित केले जाणार आहे. यामध्ये येणारे अनधिकृत बांधकामही काळानुरूप हटविले जाईल.- व्ही. वेणुगोपाळ,मुख्य नियोजनकार,‘नैना’ प्रकल्प