नवी मुंबई : ठाण्यावरून पनवेलला जाणा-या लोकलचे कप्लिंग तुटल्याने ट्रान्स हार्बर मार्गाची रेल्वे वाहतूक सुमारे दीड तासासाठी ठप्प झाली होती. घणसोली स्थानकात वेळीच हा प्रकार निदर्शनास आल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मात्र, ऐन संध्याकाळच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले.मंगळवारी ४.३० वाजण्याच्या सुमारास घणसोली स्थानकात हा प्रकार घडला. ठाण्यावरून पनवेलला जाणारी लोकल स्थानकात आली असता, दोन डब्यांना जोडणारे कप्लिंग तुटलेले असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सदर लोकल स्थानकातच थांबवून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कारणामुळे पनवेलकडे जाणाºया लोकलच्या एका पाठोपाठ एक, अशा रांगा लागल्या होत्या. तर वाशीहून ठाण्याकडे जाणारी लोकलच नसल्यामुळे प्रवाशांना स्थानकातच ताटकळत उभे राहावे लागले. चाकरमान्यांच्या ऐन घरी जाण्याच्या वेळीच हा प्रकार घडला. त्यामुळे ठाणे ते वाशी दरम्यानच्या सर्वच स्थानकांवर मोठी गर्दी झाली होती. काही लोकल दोन स्थानकांच्या मध्येच अडकून पडल्या होत्या. त्यामधील अनेक प्रवाशांना पर्यायी लोकल सोडून पायपीट करावी लागली, तर काहींनी खासगी वाहनांचा वापर करत निश्चित स्थळ गाठले. अखेर सुमारे ४० मिनिटांच्या प्रयत्नांनंतर तुटलेले कप्लिंग जोडण्यात रेल्वे कर्मचाºयांना यश आले. त्यानंतर सुमारे ५.३० वाजल्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गाची ठप्प झालेली रेल्वेवाहतूक सुरू झाली. मात्र, एका पाठोपाठ थांबलेल्या रेल्वे व स्थानकांत जमलेली प्रवाशांची गर्दी नियंत्रित होण्यास पुढील दोन तास लागले.
कप्लिंग तुटल्याने ट्रान्स हार्बरचा खोळंबा, दीड तासानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 2:25 AM