पनवेल : खारघर शहरातील सेक्टर ८ परिसरात माकडाने धुमाकूळ घातला आहे. सेक्टर ८ व २ मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरातील सहा ते सात रहिवाशांवर हल्ला करून माकडाने जखमी केले आहे.
स्थानिकांच्या तक्रारीनंतर वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला आहे. मात्र वनविभागाने लावलेला पिंजरा निष्फळ ठरल्याचे दिसून येत आहे. माकडाने पिंजºयात ठेवलेली केळी खाऊन पोबारा केल्याचे परिसरातील नागरिक सांगतात.
सेक्टर ८ मधील प्रताप सोसायटीच्या परिसरात वनविभागाने हा पिंजरा मागील पाच दिवसांपासून लावला आहे. माकड पिंजºयात शिरून केळी खाऊन बाहेर पडल्याने वनविभागाची यंत्रणा निष्फळ ठरली आहे. सेक्टर ८ व २ मध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी संकुले आहेत. खारघर स्थानकाकडे जाण्यासाठी येथूनच मार्ग असल्याने याठिकाणी नागरिकांची सतत वर्दळ असते. सेक्टर ८ मधील शाळेत विद्यार्थी व पालकांची गर्दी असते. अशा परिस्थितीत पिसाळलेल्या माकडापासून रहिवासी व विद्यार्थ्यांना धोका असल्याने वनविभागाने सक्षम यंत्रणा राबवून माकडाला पकडणे गरजेचे आहे. वनविभागाने याठिकाणी ठेवलेला पिंजरा केवळ शोभेची वस्तू असल्याचा आरोप सेनेचे विभागप्रमुख व येथील रहिवासी रामचंद्र देवरे यांनी केला आहे. वनविभागाने यासंदर्भात लवकर पाऊल उचलणे गरजचे आहे. वनविभागाने बसविलेला पिंजरा निष्फळ ठरत असल्याने रहिवाशांनी वनविभागाचे अधिकारी डी. एस. सोनावणे यांना याबाबत कल्पना दिल्यानंतर वनविभागाने हा पिंजरा दुरुस्त केला.
माकडाने पिंजºयात प्रवेश केला. मात्र ज्या भागाला स्पर्श झाल्यानंतर पिंजºयाचा दरवाजा बंद होतो, त्या भागाला माकडाचा स्पर्श झाला नसल्याने माकड बाहेर गेले. माकडाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - डी. एस. सोनावणे, अधिकारी, वनविभाग पनवेल