जनजागृतीसाठी साकारला ‘कचरासुर’; नवी मुंबई महापालिकेचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 01:09 AM2020-01-03T01:09:57+5:302020-01-03T01:10:08+5:30
चित्ररथावर प्रतिकृती; एलईडी स्क्रीनचाही समावेश
नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये जनसहभाग वाढविण्यासाठी महापालिकेने चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. या रथावर कचरासुराची प्रतिकृती बसविण्यात येणार आहे. चेंडू मारून कचरासुराचा नाश करण्याची स्पर्धा ठेवली जाणार असून विजेत्यांना बक्षीसही देण्यात येणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा देशात तिसरा क्रमांक आला आहे. हा क्रमांक टिकविण्यासाठी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जय्यत तयारी सुरू केली आहे. अभियानामधील जनसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून चित्ररथ तयार करण्यात आला आहे.
रथावर कचरासुराची प्रतिकृती ठेवण्यात येणार आहे. त्याला चेंडू मारल्यावर तो निश्चित ठिकाणी लागल्यास कचरासुराचा नाश केल्याबद्दल बक्षीस दिले जाणार आहे. खेळाच्या व मनोरंजनाच्या माध्यमातून कचरामुक्तीचा संदेश प्रसारित करण्यात येणार आहे. या रथावर एल.ई.डी. स्क्रीनद्वारे कचरा निर्मूलनाविषयी जनजागृतीपर संगीतमय क्लीप्स प्रसारित केल्या जाणार आहेत. आकाशी निळ्या रंगात सजविजेले हे वाहन लक्षवेधी असून, त्यावर ओला कचरा, सुका कचरा व घरगुती घातक कचरा यांचे प्रतिकात्मक डबेही नागरिकांच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आले आहेत. चित्ररथाच्या शुभारंभप्रसंगी आरंभ क्रिएशन या संस्थेने एक पाऊल स्वच्छतेकडे या विषयावर मिलिंद खानविलकर लिखित व दिग्दर्शित मनोरंजन व प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. शहरातील चौकाचौकांत व गल्ल्यांमध्ये स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यात येणार आहे.
महापौर जयवंत सुतार यांनी स्वच्छतारथाच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सर्व भागात स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात येणार आहे. नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन या स्पर्धेतील मानांकन वाचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनीही स्वच्छता अभियानामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या वेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृहनेते रवींद्र इथापे, सुधाकर सोनावणे, अनंत सुतार, अनिता मानवतकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, उपायुक्त तुषार पवार, डॉ. बाळासाहेब सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
टाकाऊ वस्तूंपासून शिल्पाकृती
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा ई-कचरा यापासून स्वच्छ सर्वेक्षण २०२० ही कलात्मक शिल्पाकृती ११० संगणकाच्या टाकाऊ मदरबोर्डपासून आठ दिवसांत बनवली आहे. १५ फूट लांब आणि सात फूट उंचीची ही वर्तुळाकार शिल्पाकृती २०० किलो वजनाची आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शून्य कचरा ही संकल्पना प्रत्यक्षात आणत पर्यावरणशील स्मार्ट कलात्मक शहर ही नवी मुंबईची ओळख या शिल्पामधून निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यापूर्वीही टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना राबवित ग्रीन सोसायटी फोरमने महापालिका मुख्यालयात आणि स्वच्छता पार्क कोपरखैरणे येथे संगणकाच्या टाकाऊ मदरबोर्डपासून भारत देशाच्या नकाशाची शिल्पाकृती साकारली होती. ज्याला मदर इंडिया बोर्ड असे आकर्षक नाव देण्यात आले होते. त्याचेच पुढचे पाऊल टाकत कलात्मक विचारांच्या या समूहाने नागरिकांनी टाकून दिलेल्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांची सात हजार झाकणे पाच दिवस शहरभर फिरून जमा केली व त्यामधून दहा दिवसांत ‘फिफा’ स्पर्धेच्या ‘रिसायकलेडेलिक फिफा म्युरल’ हे अभिनव शिल्प महापालिका मुख्यालयासमोर साकारले होते.