कळंबोली : तळोजा क्षेपणभूमीवर कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी केलेला विरोध अद्याप मावळला नाही. त्यामुळे सिडको वसाहतीतील घनकचरा व्यवस्थापन अडचणीत सापडले आहे. कचरा नियमित उचलला जात नसल्याने कळंबोली वसाहतीतील कचराकुंड्या ओसंडून वाहत आहेत, तर रस्त्यांवरही कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. याबाबत तोडगा काढण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. सिडकोची तळोजा येथील घोट येथे क्षेपणभूमी आहे. परंतु त्या ठिकाणी शास्त्रशुध्द पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने स्थानिकांनी त्यास विरोध दर्शवला आहे. गेल्या वर्षभरापासून स्थानिकांचे आंदोलन सुरू असून सर्व पक्षांनी त्यास पाठिंबा दिला आहे. वहाळ येथील मोकळ्या भूखंडावर कचरा डम्प करण्यास ग्रामस्थ विरोध करीत आहेत. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सिडकोने नवीन एजन्सी नियुक्ती केली असली तरी कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे कळंबोली वसाहतीत नियमित कचरा उचलला जात नाही. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. तीन-तीन दिवस सेक्टर १२, १४, १५ व हॉकर्स प्लाझासमोर कचरा उचलला जात नाही. याशिवाय ज्या ठिकाणी सार्वजनिक कचराकुंड्या ठेवल्या आहेत, त्यातून कचरा बाहेर रस्त्यावर पसरला असून दुर्गंधी पसरत आहे. कॉम्पेक्टरद्वारे कचरा उचलण्याऐवजी एक-दोन ठिकाणे वगळता सर्वच ठिकाणी ट्रक अथवा डम्परमधून कचरा वाहतूक होताना दिसते. त्यामुळे कळंबोलीकरांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे मत रमेश बगाडे यांनी व्यक्त केले. यासंदर्भात सिडकोचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. बावस्कर यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिक्रि या मिळू शकली नाही.
कळंबोलीत रस्त्यावर कचऱ्याचे ढीग
By admin | Published: April 11, 2017 2:13 AM