कळंबोली : मुंबई-उपनगरातून गावी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळच्या एसटी बसेसबरोबर खासगी बसेसनाही नागरिकांकडून प्रधान्य दिले जाते. वर्षभर प्रवास करण्यासाठी खासगी बसेसचा आधार घेतला जातो. कोरोनामुळे पाच महिन्यांपासून पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथील १५० ट्रॅव्हल्स बुकिंग आॅफिस बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अनलॉक टप्पा ४ मध्ये खासगी ट्रॅव्हल्स सुरू करण्यास परवानगी मिळेल, याकडे लक्ष लागले आहे.पनवेल परिसरात, अहमदनगर, गोवा, लातूर, पुणे, कोकण, विदर्भ, घाटमाथ्यावरील मोठ्या प्रमाणात कामानिमित्त नागरिकांचे वास्तव्य आहे. पनवेल येथून गावी जाण्यासाठी एसटी बसेसबरोबर खासगी ट्रॅव्हल्सने मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या ठिकाणी राज्यातील, तसेच परराज्यातील नागरिक वास्तव्य करतात. पनवेल परिसरात १५०च्या जवळपास बुकिंग करणारे आॅफिस आहेत. कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून खासगी बसेस बंद असल्याने ट्रॅव्हल्स बुकिंग आॅफिस बंद झाली आहेत. बसेस चालविण्यास शासनाकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स मालक, ड्रायव्हर, क्लीनरसह बुकिंग करणारेही संकटात सापडले आहेत. भाड्यामुळे आॅफिस बंद करण्याची वेळ आली असल्याचे ओम नम:शिवाय ट्रॅव्हल्स आॅफिसचे मालक बालाजी गुरमे यांनी सांगितले. एक सीट बुकिंग केल्यास ३० ते ५० रुपये मिळतात. दिवसभरात १५ ते २० सीटची बुकिंग होते. त्यातून आॅफिस खर्च, कामगार यांचा पगार दिला जात असल्याचे गुरमे म्हणाले. सुट्टीच्या काळात जास्त बुकिंग केली जाते. त्यावरच उदरनिर्वाह चालतो. शासनाची खासगी लक्झरी बसेसला परवानगी मिळावी, अशी अपेक्षा आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे आॅफिस बंद आहेत . पाच महिन्याचे गाळे भाडे थकले आहेत. तेही देणे कठिण झाले आहे. सप्टेंबर महिन्यात ट्रॅव्हल्स सुरू झाले तर दिलासा मिळेल.- विनोद पवार,नॅशनल ट्रॅव्हल्स, पनवेलआमचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्स बुकींवर आहे. गेली १२ वर्षांपासून हे काम करतोय. पहिल्यांदा कोरोनामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शासनाने महामंडळ बसेस सुरू केल्या आहेत, तसे ट्रॅव्हल्स सुरू करण्यास परवानगी द्यावी.- प्रकाश रानमारे,अनिकेत ट्रॅव्हल्स सिबीडी बेलापूरकोरोनाच्या काळात मालकाने अर्धे भाडे माफ केले आहे. पाच महिन्यांचे अर्धे तरी भाडे द्यावेच लागणार आहे. यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. लवकर ट्रॅव्हल्स चालू करण्यास परवानगी दिली, तर आमचाही व्यवसाय सुरू होईल.आॅफिस बंद असल्यामुळे पैशांची चणचण भासत आहे. कुटुंब सांभाळणे कठीण झाले आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे, हीच माफक मागणी आहे .- हर्षल भोसले,श्री गणेश ट्रॅव्हल्स,कामोठे
दुकाने बंद असल्याने ट्रॅव्हल्स बुकिंग घेणारे संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2020 1:21 AM