मुंबई ते गोवा पायी प्रवास : अवयवदानाच्या जागृतीसाठी ज्येष्ठांची दिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 02:21 AM2018-02-27T02:21:01+5:302018-02-27T02:21:01+5:30
अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी द फेडरेशन आॅफ आॅरगन अॅण्ड बॉडी डोनेशन या संघटनेच्या वतीने मुंबई ते गोवापर्यंत दिंडी काढण्यात आली आहे.
नवी मुंबई : अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी द फेडरेशन आॅफ आॅरगन अॅण्ड बॉडी डोनेशन या संघटनेच्या वतीने मुंबई ते गोवापर्यंत दिंडी काढण्यात आली आहे. नवी मुंबईत या दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करून त्यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी अद्यापही मोठ्या प्रमाणात गैरसमज आहे. मृत्यूनंतर शरीराचा एखादा अवयव दान केल्यास पुढच्या जन्मी त्या अवयवाचे अपंगत्व लाभते, असे गैरसमज अनेकांमध्ये आहेत. त्यामुळे नेत्र, त्वचा, देह अशा अवयवांचे दान करण्याची भीती व्यक्त केली जाते. परिणामी, एखाद्या दुर्घटनेत मृत्यूशी झुंज देत असलेल्यांना आवश्यक अवयव उपलब्ध न झाल्यास, जरी त्यांचे प्राण वाचले तरीही अपंगत्व आलेले असते. या परिस्थितीमुळे सद्यस्थितीला अनेक जण डोळे, त्वचा याच्या दात्यांच्या प्रतीक्षेत काही जण अंथरुणाला खिळून आहेत. तर देहदाते नसल्याने वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन संशोधन करणाºया डॉक्टरांनाही चाचणीकरिता देह मिळत नाहीत. अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी पुरुषोत्तम पवार यांनी द फेडरेशन आॅफ आॅरगन अॅण्ड बॉडी डोनेशन या संघटनेची स्थापना करून गतवर्षी प्रथम जनजागृती मोहीम हाती घेतली. ऐरोली, घणसोली, वाशी, सीबीडी येथील नागरिकांशी सुसंवाद साधत त्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. ही दिंडी घणसोली परिसरात आली असता, त्या ठिकाणी प्रभात चॅरिटेबल ट्रस्टचे डॉ. प्रशांत थोरात व वारकरी संप्रदायाच्या वतीने कीर्तनकार सुनीलबुवा रानकर, माजी नगरसेवक दीपक पाटील यांनी दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर टाळ, मृदुंगाच्या तालावर घणसोली गावात जनजागृती दिंडी काढण्यात आली.