नवी मुंबई : शहरात एकाच वेळी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु असल्याने दोन प्रशासनात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. यामध्ये सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून हवेत धूलिकणांचीही मोठी भर पडत आहे. दरम्यान या कोंडीतून लवकर सुटका होईल का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
मागील काही दिवसांपासून महापालिकेमार्फत ठिकठिकाणी रस्त्यांच्या, पुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामादरम्यान काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी रहदारीसाठी अर्धा रस्ता बंद करण्यात आला आहे. परंतु पर्यायी मार्गांवर देखील खोदकामे झालेली असल्याने नेमकं जायचं तरी कुठून असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामध्ये सीबीडीकरांना वाहतूक कोंडीने चांगलेच खिंडीत गाठले आहे.
सायन पनवेल मार्गावरील उरणफाटा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असून त्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनुमती दिली आहे. त्यामुळे पर्यायी बेलापूर येथून पामबीच मार्गे वाहने वळवली जात आहेत. मात्र त्याचवेळी आग्रोळी जंक्शन, सीबीडी स्थानक याठिकाणी देखील रस्त्यांचे काम सुरु असल्याने रहदारीला रस्ता अपुरा पडत आहे. यामुळे खिंडीतल्या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी बेलापूर मार्गे वाहन वळवल्यास तिथल्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
अशीच परिस्थिती तुर्भे, वाशी सेक्टर ९ याठिकाणी देखील निर्माण होत आहे. वाशी सेक्टर ९ येथे पादचारी पुलाचे काम सुरु असल्याने त्यासाठी निम्मा रस्ता खोदलेला आहे. तर तुर्भे स्थानकासमोर नवा पूल उभारला जात असल्याने युद्ध पातळीवर खोदकाम सुरु असून त्यासाठी दोन्ही मार्गावरील केवळ एक लेनचा रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. यामुळे अवजड वाहने एमआयडीसी मार्गे निश्चित ठिकाणी वळवण्यात आली आहेत. तर हलक्या वाहनांसाठी मार्ग खुला असल्याने सकाळ, सांध्याकाळ त्याठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या प्रमुख कामांशिवाय शहरात इतरही ठिकाणी एकाच वेळी रस्त्यांवर छोटी मोठी खोदकामी सुरु आहेत. प्रशासनाने काढलेल्या या कामांना एकाच वेळी वाहतूक पोलिसांनी देखील हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यातच खोदकामांची धूळ हवेत पसरत असल्याने दुचाकीस्वारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.