नवी मुंबई : राज्याबाहेरून मुंबईत येणाऱ्या खासगी ट्रव्हर्सलमध्ये बनावट नोंदणीच्या ट्रव्हर्सचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. समृद्धी मार्गावरील ट्रव्हर्सलच्या अपघातानंतर नवी मुंबई आरटीओने केलेल्या तपासणीत १८ ट्रव्हर्सलची नोंदणी बनावट असल्याचे तसेच आपत्कालीन दरवाजा बंद करून त्याठिकाणी प्रवास्यांची बैठक व्यवस्था केल्याचे दिसून आले. याप्रकरणी सोमवारी सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समृद्धी मार्गावरील भरधाव ट्रव्हर्सचा अपघात होऊन प्रवास्यांचा जळून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर आरटीओने राज्यभरातील ट्रॅव्हल्सच्या तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्यामार्फत नवी मुंबईतून धावणाऱ्या ट्रव्हर्सलची तपासणी केली जात होती. त्यामध्ये काही खासगी ट्रॅव्हल्समध्ये मागील आपत्कालीन दरवाजा बंद करून त्याठिकाणी प्रवास्यांसाठी वाढीव बैठक व्यवस्था केल्याचे आढळून आले. त्यामध्ये बहुतांश ट्रॅव्हल्सची अरुणाचल प्रदेशातली नोंदणी होती. काही ट्रॅव्हल्स जप्त करून त्यांची सखोल तपासणी सुरु करण्यात आली होती.
त्यामध्ये सदर ट्रव्हर्सलच्या चेसिस मध्ये खाडाखोड करून बनावट नोंदणी असल्याचे आढळून आले. त्यामुळे आरटीओच्या पथकाने तब्बल १७५ ट्रॅव्हल्स तपासल्या असता त्यापैकी १८ ट्रॅव्हल्सची चेसिस मध्ये खाडाखोड करून, बनावट कागद्पत्राद्वारे अरुणाचल प्रदेशमध्ये नोंदणी झाल्याचे समोर आले. त्यामुळे या ट्रॅव्हल्स मालकांकडून आर्थिक फायद्यासाठी प्रवास्यांचे जीव धोक्यात घालून महाराष्ट्रात ट्रॅव्हल्स चालवल्या जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरटीओ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस व आरटीओ अधिक तपास करत आहेत.