अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : नवी मुंबई, मुंबईसह पनवेल तालुक्यात वर्षभरापासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या टाळेबंदीनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. त्याचबरोबर ट्रॅव्हल्स पुन्हा सुरू झाल्या होत्या. लॉकडाऊनमध्ये ठप्प झालेले आर्थिक व्यवहार मार्गी लागत असताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा ट्रॅव्हल्सचे चाक जाम झाले आहे. कोरोना संसर्गामुळे प्रवासी कमी होत असल्याने ट्रॅव्हल्सची संख्या अगोदरपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसत असल्याचे ट्रॅव्हल्स चालकाचे म्हणणे आहे.
राज्य परिवहन महामंडळाला पर्यायी व्यवस्था म्हणून ट्रॅव्हल्सकडे पाहिले जाते. उन्हाळी, दिवाळी सुट्टी सोडले, तर ऑफसीजनमध्ये महामंडळपेक्षा कमी भाड्यात प्रवासी, ट्रॅव्हल्सने गावी ये-जा करतात. कामानिमित्त राज्य, राज्याबाहेरदेखील मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्सचा प्रवासासाठी उपयोग करतात. कोरोनामुळे टाळेबंदी केल्यानंतर या व्यवसायावर आर्थिक संकट कोसळले होते. अनलॉकनंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. त्यात ट्रॅव्हल्स व्यवसायाची रुतलेली चाके फिरू लागली. त्यामुळे आर्थिक घडी बसत असतानाच आता कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने गावी जाण्याऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे आता वाहन चालविण्यासाठी बुकिंग होत नाही. कर्जावर खरेदी केलेल्या गाडीचे हप्ते भरणे अवघड झाले आहे. काहींचे बँकेचे हप्ते थकले आहेत, तर काही बसेस चालविणे कठीण झाल्याने पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आल्या आहेत.
गाडी रुळावर येत होती, पण... कोरोनाचा प्रकोप ओसरल्यानंतर ट्रॅव्हल्स व्यवसाय पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, पुन्हा कोरोना संसर्गात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. दररोज हजारपेक्षा जास्त मुंबई, नवी मुंबई, पनवेल परिसरातून जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेसची संख्या आता ४० टक्क्यांवर आली आहे.
दोन वर्षांपासून ट्रॅव्हल्स व्यवसायात मंदी आहे. कोरोनाचा प्रकोप त्याच बरोबर डिझेलच्या किमती वाढ झाल्याने गाडी चालविणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे काही बसेसचे मार्ग बंद केले आहेत. उभ्या गाड्या असल्याने बँकेचे हप्ते भरणेदेखील होत नाहीत. त्याचबरोबर टॅक्स कसा भरायचा हादेखील प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. मनोज पाटील, ट्रॅव्हल्स मालक पनवेल
गाडी खरेदी करताना बँकेकडून कर्ज घेतले. व्यवसाय करून फरतफेड करता येईल अशी आशा होती. मात्र, कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. गाडीची चाके थांबल्याने आर्थिक बाबी कमजोर झाल्या आहेत. शासनाकडून याबाबत आमचा विचार केला जात नाही. बँक हप्त्यांचे मोठे संकट ओढावले आहे. प्रकाश रानमारे, ट्रॅव्हल्स मालक सीबीडी बेलापूर
डिझेल वाढले, तिकीट मात्र पूर्वीचेच कोरोना संकटात डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिला जात असल्याचा प्रकार होत असल्याचे मत ट्रॅव्हल्स मालकांनी व्यक्त केले आहे. एकीकडे कोरोनाचा प्रकोप, तर दुसरीकडे डिझेल वाढ या कोंडीत ट्रॅव्हल्स व्यवसाय सापडला आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांची परिस्थिती खालावली आहे. त्यामुळे प्रवासी भाड्यात वाढ होत नाही. डिझेल दरात वाढ झाली आहे; पण तिकीट मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू आहे.