पनवेल : केंद्रीय होमिओपॅथी संशोधन संस्थाअंतर्गत आयुष मंत्रालयाच्या अधिपत्याखाली विभागीय होमिओपॅथी संशोधन संस्थेचे महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय खारघरमध्ये सुरू झाले आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आयुष मंत्रालयाच्या सूचनेनुसार संबंधित रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) कार्यान्वित करण्यात आला आहे. यात आयुष रुग्णालयाचे प्रभारी संशोधन अधिकारी डॉ. रमेश बावस्कर हे काम पाहत आहेत. नियोजनबद्ध उभारलेल्या या वास्तूचे काम केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सिडकोने पूर्ण केले आहे. २० रुपयांची फी भरून रुग्णांना या ठिकाणी उपचार घेता येणार आहेत. खारघर सेक्टर १८ मध्ये प्लॉट नं. ३८, ३९ या भूखंडावर हे रुग्णालय आहे. सध्या स्थिती काय?सध्याच्या घडीला हे रुग्णालय पूर्णक्षमतेने कार्यान्वित झाले नसले तरी चार संशोधन अधिकारी व इतर कर्मचारी असे २४ कर्मचारी येथे आहेत. कोणत्या वेळेत उपचार?सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ओपीडी सुरू असेल. लवकरच या ठिकाणी सोनोग्राफी, एक्स-रे, सिटी स्कॅन मशिनरीदेखील कार्यान्वित होणार असल्याची माहिती रुग्णालयाचे प्रभारी संशोधन अधिकारी डॉ. बावस्कर यांनी दिली.कसे आहे रुग्णालय?तळमजला अधिक तीन अशा स्वरूपाच्या या रुग्णालयात संशोधन अधिकाऱ्यांसाठी प्रशस्त दालने, मीटिंग रूम, किचन, नर्सिंग रूम, कार पार्किंग आदींची व्यवस्था आहे. या ठिकाणी रुग्णांसाठी ५० खाटांची व्यवस्था होऊ शकेल असे हे रुग्णालय आहे. त्वचेचे आजार, ॲलेर्जेटिक आजार, सांधेदुखी आदी सर्व प्रकारच्या असाध्य रोगांवर उपचार केले जाणार आहेत. या रुग्णालयात होमिओपॅथी पद्धतीने अद्ययावत उपचार केले जाणार आहेत. यामध्ये सर्व प्रकारच्या असाध्य रोगांचा समावेश आहे. ॲलर्जी आजारांवर याठिकाणी संशोधन केले जात असून त्याचा फायदा रुग्णांना होणार आहे. -डॉ. रमेश बावस्कर, प्रभारी, संशोधन अधिकारी होमिओपॅथी हॉस्पिटल, खारघर
असाध्य आजारांवर २० रुपयांत उपचार! खारघरमध्ये महाराष्ट्रातील पहिले होमिओपॅथी रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 6:30 AM