नवी मुंबई : खाजगी कार्यक्रमासाठी मैदानातील दोन वृक्ष तोड केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे. याप्रकरणी पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत असून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.कोपरखैरणे सेक्टर २३ येथील भूमिपुत्र मैदानालगतच्या मोकळ्या मैदानात हा प्रकार घडला आहे. परिसरातील तरुणांकडून हे मैदान खेळासाठी वापरले जात आहे. त्यानुसार सकाळ, संध्याकाळ त्याठिकाणी मुलांची खेळासाठी गर्दी जमलेली असते. याच मैदानाच्या मध्यभागी दोन बोरीची झाडे आहेत. अनेक वर्षे जुन्या झाडांवर विविध पक्ष्यांची घरटी होती. त्याठिकाणी रोज पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असायचा. मात्र काही दिवसांपूर्वी परिसरात झालेल्या एका खाजगी कार्यक्रमासाठी येणाऱ्यांच्या वाहन पार्किंगची सोय त्याठिकाणी करण्यात आली होती. याच कालावधीत दोन्ही वृक्षांची छाटणी करण्यात आलेली आहे. वाहन पार्किंगसाठी मैदानाचा वापर करतानाच संबंधितांनी ही वृक्षतोड केलेली असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी विकास चव्हाण यांनी केला आहे. तर या प्रकारात विविध पक्ष्यांच्या घरट्यांचीही हानी झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
खाजगी कार्यक्रमासाठी वृक्षतोड
By admin | Published: November 17, 2015 12:42 AM