लोकमत न्यूज नेटवर्क कळंबाेली : पनवेल रेल्वे स्थानकासमोरील अरुणोदय चौकाचे सिडकोकडून सुशोभीकरण करण्यात आले. त्याकरिता लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु देखभालीकडे सिडकोकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने लावलेली शोभेची झाडे पाण्याविना सुकून गेली आहेत. त्यामुळे परिसरातील हिरवाई गायब झाली आहे. याकडे सिडको प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पनवेल रेल्वे स्थानकासमोरील अरुणोदय चौकाचे २०११ साली सुशोभीकरण करण्यात आले आहे. या चौकातील सर्कलमध्ये शोभेची वेगवेगळी झाडे लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर डिझाईनसह शिल्पही उभारण्यात आले आहे. २६ मार्च २०११ साली सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांच्या हस्ते या सुशोभीकरण करण्यात आलेल्या चौकाचे उद्घाटन करण्यात आले. चौकातील झाडे, लाईट लावल्याने परिसर उजळला होता. झाडांमुळे हिरवाई आली होती. देखभालीसाठी सिडकोकडून व्यवस्था करण्यात आली होती. परंतु याकडे सिडको प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढते तर उन्हाळ्यात झाडे पूर्णपणे सुकतात. सद्य:स्थितीत ही झाडे पूर्णत: होरपळली आहेत. झाडांच्या फांद्यांवरील पाने गळून गेली आहेत. लहान झाडेदेखील पाण्याविना जळाली आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा करण्यात आलेला खर्च वाया जात आहे. उभारलेले शिल्पही धूळ उडून खराब झाले आहे. त्याकडेसुद्धा दुर्लक्ष झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जागोजागी साचलाय कचराअरुणोदय चौकात सर्कलला लोखंडी कम्पाउंड करण्यात आले आहे. त्याचा कलर उडून लोखंड गंजले आहे. जागोजागी कचरा फेकण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बाजूला झोपडपट्टी आहे. तसेच या ठिकाणी गर्दुल्ल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. झोपडपट्टीधारकांकडून येथील कम्पाउंडवर धुतलेले कपडे सुकविले जात आहेत.