पनवेल : या वर्षी वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात धोकादायक झाडे रस्त्यावर कोसळली. अनेकांच्या वाहनांचे नुकसान झाले. मात्र, ही कोसळलेली झाडे सिडको प्रशासनामार्फत उचलण्यास टाळाटाळ केले जात असल्याचे अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहे. या कामांसाठी करोडो रुपये खर्च करणाऱ्या सिडको प्रशासनाविरोधात लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
खारघर, कामोठे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी सिडकोने उभारलेल्या वसाहतींमध्ये पावसाळ्यात उदभवणाºया परिस्थितीत काम करण्यासाठी सिडकोतर्फे दरवर्षी आपत्कालीन कक्ष उभारला जातो. पावसाळ्याच्या चार महिने हा कक्ष कार्यान्वित असतो.यंदा १ जूनपासून हा कक्ष सुरू झाला. तो सुरू झाल्यानंतर अवघ्या तिसºया दिवसानंतर आलेल्या निसर्ग वादळाचा फटका मोठ्या प्रमाणात पनवेल तालुक्याला बसला.
सिडको वसाहतीतील झाडे कोसळली. रस्त्यावर कोसळलेली झाड्यांची फांद्या, झाडे बाजूला सरकवून रस्ता मोकळा करण्याचे काम सिडको आणि पनवेल महापालिकेने केले. मात्र, चोवीस तास आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित असल्याचा दावा करणाºया सिडकोचे आपत्कालीन यंत्रणेने ही झाडे हलविण्याची तसदी घेतलेली नाही.
निसर्गवादळ आणि त्यानंतर वादळी पावसात पडलेली मोठी झाडे आजही रस्त्याच्या कडेला पडून आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होतो आहे, तर झाडे केवळ रस्त्याच्या बाजूला सरकवून काम पूर्ण केले असल्याचा आरोप खारघरचा राजा रहिवासी मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केला आहे. केवळ फांद्या छाटून काही ठिकाणी लाकडांचे खोड करून ठेवले आहे. हा प्रकार कळंबोली, खारघरमध्ये सर्वांत जास्त ठिकाणी पाहायला मिळतो आहे.
सिडकोने आपत्कालीन स्थितीतील काम तरी वेळेत केले पाहिजे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.ही झाडे वेळेत बाजूला सारली पाहिजेत, अन्यथा अपघाताचा मोठा धोका निर्माण होऊन निष्पाप नागरिकाला आपला जीव गमवावा लागेल. -दीपक निकम, शिवसेनेचे पनवेल तालुका संघटक