भिवंडी : सरकारने नोटाबंदी केल्यानंतर शहरात सावकारी व्यवसायाआड सुरू असलेले ‘चेक वटाव’चे व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे यंत्रमाग कारखानदार अडचणीत आले आहेत.कापड उत्पादन व विक्री व्यवसायात अधिकाधिक व्यवहार रोखीने होतात. यासाठी बँक व्यवस्थापकांना हाताशी धरून स्थानिक यंत्रमाग कारखानदार व कापड व्यापारी विविध बँकांत बचत किंवा चालू खाते उघडून ते वर्षाच्या आत बंद केले जात होते. अशा खात्यामधून क्रॉस चेक वटवण्याचा व्यवसाय शहरातील अनेक सावकार वर्षानुवर्षे करीत होते. या सावकारांकडून रोखीने रक्कम घेत कारखाना मालक व चालक कामगारांचा पगार व इतर व्यवहार करीत होते. त्यापैकी बऱ्याच परप्रांतीय कारखानामालकांनी रोखीने आपल्या गावाला अन्य मालमत्ता खरेदी केली. परंतु, ५००, १००० हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने शहरातील सावकारांचे रोखीचे व्यवहार आता बंद झाले आहेत. मात्र, या महिन्याचे पगार कारखानामालकांनी रोखीने केल्याने कामगारांना आपली कामे सोडून बँकेच्या रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी रांगेतील शिस्त बिघडून धक्काबुक्कीचे प्रकार झाले. त्यामुळे गर्दीला आवर घालण्यासाठी व चेंगराचेंगरी होऊ नये, म्हणून कोटरगेट जकातनाका येथील स्टेट बँक व कल्याण रोड, लाहोटी कम्पाउंड येथील पंजाब नॅशनल बँक, अॅक्सिस बँक येथे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. (प्रतिनिधी)
भिवंडीत ‘चेक वटाव’ पद्धती बंद
By admin | Published: November 18, 2016 2:49 AM