तालुक्यात आदिवासींचे पाण्यासाठी जागरण थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 12:31 AM2021-05-08T00:31:55+5:302021-05-08T00:32:12+5:30
भक्ताच्या वाडीतील नळपाणी योजनेतून वाडीत पोहोचले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायतीमधील भक्ताच्या वाडीतील आदिवासींना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर रात्र काढावी लागत होती. त्याच वाडीच्या परिसरात शासनाची आदिवासी आश्रमशाळा असून, निवासी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांचे हित महत्त्वाचे असल्याने, स्थानिक आदिवासी पाण्यासाठी रात्रीचा दिवस करायचे. दरम्यान, तत्कालीन समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे यांनी आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्पांतर्गत पाणीटंचाई निवारण कार्यक्रमामधून ३५ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर करून घेतली. त्या नळपाणी योजनेचे लोकार्पण करण्यात आल्याने भक्ताच्या वाडीत आता पाणी पोहोचले आहे.
कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील मौजे भक्ताची वाडी येथील ९० आदिवासी घरांची वस्ती आहे. वाडीच्या बाहेर शासनाची शासकीय आदिवासी आश्रम शाळा असून, तेथे एक हजारहून अधिक विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. वाडीमध्ये शासकीय आश्रमशाळा असल्याने आणि आपल्या तालुक्यातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने, स्थानिक आदिवासी आपल्या वाडीच्या विहिरीवर पहिले प्राधान्य आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना द्यायचे. त्यामुळे मोग्रज ग्रामपंचायती मधील भक्ताची वाडीतील ग्रामस्थ बऱ्याच वर्षांपासून नळपाणीपुरवठा योजनेची मागणी करत होते.
येथील महिला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पाणी मिळावे, म्हणून आठवड्याचे नियोजन करून रात्रभर विहिरीवर नंबर लावून पाणी भरायच्या.
भक्ताची वाडीमधील महिलांनी आपली व्यथा रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन समाजकल्याण समिती सभापती नारायण डामसे यांच्या निदर्शनास आणून दिली. भक्ताची वाडीमध्ये नळाचे पाणी येणार नाही, तोवर आपण मते मागायला किंवा कोणत्याही कामासाठी, समारंभासाठी येणार नाही, असे नारायण डामसे यांनी जाहीर केले होते.
आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी उपयोजनेतून ३५ लाख रुपये खर्चाची योजना मंजूर करून घेतली. या नळपाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य आणि समाज कल्याण समितीचे माजी नारायण डामसे यांच्या हस्ते झाले. यावेळी कर्जत पंचायत समिती सदस्या जयवंती दत्तात्रय हिंदोळा, मोगरज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुन सकपाळ, आंबिवलीचे पोलीस पाटील बाळू खेडेकर, पुरोगामी युवक संघटनेचे महेश म्हसे, अध्यक्ष प्रभाकर रसाळ, तसेच गणेश म्हसे, आंबो आगिवले, काळुराम आगिवले, किरण रसाळ, मंगेश खेडेकर, प्रकाश खेडेकर, नामदेव मराडे, इंदुमती केवारी, अरुणा शिवाजी सांबरी उपस्थित होते.
भक्ताचीवाडी मधील पाण्याची समस्या अनेक वर्षांपासूनची होती. त्यात महिला भगिनींनी आपल्याला पाण्याची समस्या सोडवण्यासाठी विनंती केली असता आपण नळपाणी योजना येत नाही तोवर वाडीत येणार नाही असे आश्वासन दिले होते.ते आश्वासन पाळल्याचा आनंद असून वाडीत पाणी पोहचले हे देखील महत्त्वाचे असून आमच्या आदिवासी बांधवांना विहिरीवर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागणार नाही.
- नारायण डामसे, सदस्य, रायगड जिल्हा परिषद