नवी मुंबई : श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून नवी मुंबईमधील आदिवासी नागरिकांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली. खंडीत केलेली विजजोडणी पुन्हा जोडण्यात यावी. वाढीव बिलांची दुरूस्ती करण्यात यावी व विजेविषयी नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूर दरम्यान विविध ठिकाणी वास्तव्य करत असलेल्या आदिवासी नागरिकांचे महावितरण विषयी असलेले प्रश्न सोडविण्यासाठी श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचे आयोजन केले होते. वाशीमधील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करून आदिवासींचे प्रश्न निदर्शनास आणून दिले. आतापर्यंत ७ आदिवासी नागरिकांचा विजपुरवठा खंडीत केला आहे. ३६ पेक्षा जास्त आदिवासी नागरिकांना वाढीव विजबिल पाठविण्यात आले आहे. अनेकांना वेळेवर बिले दिली जात नाहीत. दोन ते तीन महिन्यांनी नागरिकांना बिल दिले जाते. प्रत्येक मिटरधारकाच्या हातात बिल दिले जात नाही. ऐरोली यादवनगर आदिवासी कातकरी पाडा परिसरामध्ये कमी दाबाने विजपुरवठा होत आहे. आदिवासी नागरिकांच्या राहत्या घरामध्ये मिटर बसविण्यात यावेत अशी मागणी आंदोलकांनी केली.
महावितरण अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून संघटनेने निदर्शनास आणून दिलेले प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनामध्ये संघटनेचे राज्य उपाध्यख दत्तात्रय कोळेकर, ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, बाळू वाघे, आत्माराम वाघे, रामदास वाघे, नंदा वाघे, रेश्मा कातकरी, आरती नाईक, जयमाला जाबर,रमेश टोकरे, लक्ष्मण वाघे, रमेश वाघे व आदिवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.