आदिवासींना मिळाल्या वनजमिनी
By admin | Published: January 9, 2016 02:20 AM2016-01-09T02:20:23+5:302016-01-09T02:20:23+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून जे आदिवासी बांधव वनजमिनी कसत होते, त्या जमिनीचा सातबारा आता त्यांच्या नावावर करण्यात आला आहे.
पनवेल : गेल्या अनेक वर्षांपासून जे आदिवासी बांधव वनजमिनी कसत होते, त्या जमिनीचा सातबारा आता त्यांच्या नावावर करण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील ५८० जणांना ३६ भूखंडांची सनद गुरुवारी पनवेल तहसील कार्यालयात वाटण्यात आली. त्यामुळे आता ही जमीन आदिवासींच्या मालकीची झाली आहे. त्यावरील अतिक्र मणाचा शिक्का पुसण्यात आला आहे.
पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या आणि पाडे आहेत. अतिशय दुर्गम भागात राहून वनवासी कसाबसा उदरनिर्वाह करतात. कित्येकांनी हक्काची जागा नसल्याने ते वन जमीन कसत आहेत. त्या जमिनीत मशागत करून भाज्या पिकवल्या जात आहेत. काहींनी याच जमिनीवर राहण्याकरिता निवारा बांधला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जमिनी हे कुटुंब कसत असतानाही वनविभागाकडून या जमिनी वर्ग करण्यात आल्या नव्हत्या. जमिनीच्या रेकॉर्डवर अतिक्र मणाचा शिक्का पडला असल्याने आदिवासींना शासकीय योजनेत भाग घेता येत नव्हता. त्याचबरोबर त्यांना लाभही मिळत नसल्याने हे कुटुंब उपेक्षित होते. या वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती.
तहसीलदार दीपक आकडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण कदम, तलाठी संदीप भंडारे, विशाल भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले. गेल्या सहा महिन्यापासून पुरावे जमा करण्याचे काम सुरू होते. हे प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले. त्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी हिरवा कंदील दिला. त्याचबरोबर सर्व कागदपत्रे तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करून गुरुवारी आदिवासींना तहसीलदार दीपक आकडे यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार बी.टी. गोसावी, कल्याण कदम, उमेश पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. त्यामुळे आता या जमिनीवर आदिवासींचा कायद्याने हक्क लागू झाला आहे. त्यांना वन आणि इतर विभागाकडून त्रास होणार नाही. (वार्ताहर)