समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आदिवासी विद्यार्थी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 04:45 AM2018-09-26T04:45:49+5:302018-09-26T04:46:03+5:30
आदिवासी समाजाच्या वन हक्क मान्यता कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. आमचा आदिवासींचा इतिहास लिहिला गेला नाही, कारण आमच्या समाजात सुशिक्षित माणसेच नव्हती, परंतु आता मात्र आम्ही गप्प बसणार नाही
- जयंत धुळप
अलिबाग : आदिवासी समाजाच्या वन हक्क मान्यता कायद्याच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. आमचा आदिवासींचा इतिहास लिहिला गेला नाही, कारण आमच्या समाजात सुशिक्षित माणसेच नव्हती, परंतु आता मात्र आम्ही गप्प बसणार नाही, अशी प्रखर प्रतिक्रि या आदिवासी युवकांनी मंगळवारी पेण येथे व्यक्त केली.
सर्व शिक्षित आदिवासी युवक व युवती हुतात्मा नाग्या कातकरीच्या ८८ व्या स्मृतिदिनानिमित्त पेण येथे अंकुर ट्रस्ट व लोकमंच संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्र मात बोलत होते. या वेळी पेणचे तहसीलदार अजय पाटणे यांना लेखी निवेदनही दिले. तत्पूर्वी रायगड बाजार पेण येथून आपल्या पारंपरिक वाद्यवृंदासह आदिवासींनी वाजतगाजत भव्य मिरवणूक काढून लहान आदिवासी बालकांनी केलेल्या आदिम जमातीच्या वेशभूषेने पेणकरांचे लक्ष वेधले.
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन गेल्या २० वर्षांपासून रायगड जिल्ह्यात पाळण्यात येतो. आदिवासींच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेण येथील आदिवासींनी प्रखर लढा देऊन आपल्या हुतात्मा नाग्या महादू कातकरीचे नाव चिरनेरच्या मूळ स्तंभावर कोरले होते. तेव्हापासून हुतात्मा नाग्याची चळवळ आदिवासींच्या अस्मितेची चळवळ म्हणून ओळखली जाते. या दिवशी ठिकठिकाणी कातकरी आदिवासी एकत्र येऊन आपल्या उपजीविकेच्या हक्कांबद्दल मांडणी करत असतात.
कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.वैशाली पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील आदिवासींची अन्नसुरक्षा राखण्यासाठी वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी कशी गरजेची आहे, तसेच रेशनवरील धान्याच्या ऐवजी रोख रक्कम टाकण्याचा शासनाचा निर्णय कसा विसंगत आहे हे आदिवासी भाषेतील भाषणात प्रभावीपणे मांडले.
तहसीलदार पाटणे यांनी वनमित्र अभियानाची सविस्तर माहिती देऊन याबाबतच्या अडचणींचे निवारण प्रभावीपणे करण्याचे आश्वासन सभेत दिले. या प्रसंगी आदिवासी सरपंच नीरा मधे, भारती पवार, गौरी कसबे, हर्षली ढेबे, विनोद वाघमारे यांनी आपले विचार मांडले. या वेळी आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रतिनिधी अजित पवार, पुरवठा अधिकारी हरी हडके यांनी योजनांची सविस्तर माहिती देऊन अडचणी समजावून घेतल्या. अंकुर संस्थेच्या झेप आदिवासी आश्रमातील मुलांनी कातकरी भाषेतील गाणी व नृत्ये सगळ्यांची वाहवा मिळवून गेली.