नवी मुंबई : पनवेलला पाणीपुरवठा करणाऱ्या देहरंग धरणाच्या टेकडीवरील टॉवरवाडी आदिवासी पाड्यातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. दोन्ही विहिरींनी तळ गाठला असून नागरिकांना धरणात खड्डे काढून तहान भागवावी लागत आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलचे नाव देशाच्या नकाशावर गेले आहे. भविष्यात नैना परिसरामध्ये तब्बल २३ स्मार्ट सिटी तयार केल्या जाणार आहेत. पुढील पाच वर्षामध्ये तब्बल ६० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या परिसरामध्ये केली जात आहे. देशातील सर्वात वेगाने विकसित होणारा परिसर म्हणून पनवेल तालुक्याकडे पाहिले जात आहे. विकासाचे स्वप्न दाखविताना येथील समस्यांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. देहरंग धरणातून पनवेल शहराला पाणी पुरवठा केला जातो.जवळपास एप्रिलपर्यंत धरणातील पाणीसाठा शहराला पुरतो. परंतु याच परिसरातील आदिवासी पाड्यांना मात्र दोन हांडे पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.सद्यस्थिती टॉवरवाडी आदिवासी पाड्यामध्ये पिण्यासाठी पाणीच नाही. गावातील दोन्ही विहिरींनी तळ गाठला आहे. १५० घरांमधील नागरिकांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नाही. नागरिकांनी धरणामध्ये ठिकठिकाणी खड्डे काढून पाणी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक वर्षी मे व जूनमध्ये भीषण टंचाईला जामोरे जावे लागत आहे. आदिवासींवरील हे संकट दूर करण्यात यावे, वर्षभर पुरेल अशाप्रकारे पाणी योजना राबविण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष देवून किमान पुढील वर्षभरामध्ये टॉवरवाडी पाणीटंचाईमुक्त होईल अशा प्रकारे योजना राबवावी व पाण्याची शोकांतिका थांबवावी, अशी विनंतीही रहिवाशांनी केली आहे.
पनवेलमधील आदिवासींच्या घशाला कोरड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 3:26 AM