आदिवासींना दिला पोलिसांनी आधार; आदिवासी विकासाच्या पनवेल पॅटर्नचे राज्यभर कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 03:50 AM2018-02-11T03:50:10+5:302018-02-11T03:50:24+5:30
गुन्हेगारी नियंत्रणामध्ये आणणारे पोलीस पनवेलमध्ये आदिवासींच्या विकासासाठी झटत आहेत. सहा आदिवासी पाडे दत्तक घेतले आहेत. पाड्यामध्ये घरकूलसह सरकारी योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : गुन्हेगारी नियंत्रणामध्ये आणणारे पोलीस पनवेलमध्ये आदिवासींच्या विकासासाठी झटत आहेत. सहा आदिवासी पाडे दत्तक घेतले आहेत. पाड्यामध्ये घरकूलसह सरकारी योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अत्यावश्यक वस्तूंचे वाटपाबरोबर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. पोलिसांनी आदिवासी विकासासाठी सुरू केलेल्या पनवेल पॅटर्नचे राज्यभर कौतुक होत आहे.
पूर्वी गावात पोलिसांची गाडी आली की, आदिवासींच्या पोटात भीतीचा गोळा उठायचा. पूर्ण गावात चर्चा सुरू व्हायची. कोणी कोणता गुन्हा केला का? कोणाला अटक झाली काय? कोणाची भांडणे झाली आहेत का? अशी विचारणा केली जायची. अनेक जण घराचे दरवाजे बंद करूनच घ्यायचे. गुन्हा घडला तरच पोलीस गावात येणार हा आतापर्यंतचा शिरस्ता होता व बहुतांश आदिवासी पाड्यांमध्ये अद्याप हीच स्थिती आहे; परंतु पनवेल तालुक्यातील कोंबलटेकडी, फणसपाडा, खैराटवाडी, पालेवाडी, डांगरेश्वरवाडी, मोहोदर व ठाकूरवाडी या आदिवासी पाड्यांमधील नागरिकांना मात्र पोलिसांची भीती वाटत नाही. पोलीस पाड्यावर यावेत, याची वाट प्रत्येक नागरिक पाहू लागला आहे. पनवेल ग्रामीण पोलीसस्टेशनने सहाही पाडे दत्तक घेतल्यामुळे हे परिवर्तन शक्य झाले आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनने त्यांच्या कार्यक्षेत्रामधील किमान एक गाव दत्तक घ्यावे व त्या गावात सरकारी योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना केल्या होत्या. नवी मुंबईचे पोलीसआयुक्त हेमंत नगराळे, उपआयुक्त राजेंद्र माने, सहायक आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सहा आदिवासी पाडे दत्तक घेऊन पाड्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी सहाही पाड्यांतील प्रत्येक घरामध्ये जाऊन सर्व नागरिकांचे नाव, वय, शिक्षण, रोजगार व इतर सर्व तपशील संकलित केला आहे. सहाही पाड्यांचे सर्वेक्षण करून प्रत्येक गावामध्ये कोणत्या सुविधा आहेत. कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, याची यादी तयार केली आहे. गावचा व गावातील प्रत्येक नागरिकाचे सर्वेक्षण केल्यानंतर एक वर्षापासून विविध योजना राबविण्यास प्रत्यक्ष सुरुवात केली आहे. प्रत्येक पाड्यातील किमान पाच नागरिकांना पहिल्या टप्प्यात घरकूल योजना मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार केले आहेत. काही पाड्यांमधील शाळांचे वीजबिल थकले होते.
पोलिसांनी रोटरी व इतर संस्थांच्या मदतीने वीजबिलेही भरून दिली आहेत. लाकूडतोड थांबविण्यासाठी स्मार्ट स्टोव्ह उपलब्ध करून दिले आहेत. ब्लँकेट व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
प्रत्येक पाड्यात मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. अनेकांवर मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या असून, पोलिसांच्या या कार्यामुळे पाड्यांचा कायापालट होत आहे.
कोंबलटेकडी
- १५३ आदिवासींची वैद्यकीय तपासणी करून, २० हजार रुपयांची औषधे वितरीत केली.
- पाड्यावरील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन दुरुस्ती
- प्राथमिक शाळेच्या विद्युत व्यवस्थेची डागडुजी व विद्युत बिल भरण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली.
- आदिवासी कुटुंबीयांना ब्लँकेट, चटई व दिवाळी फराळाचे वाटप
- आदिवासी पाड्यावर शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप, स्वयंपाकाची भांडी, शुद्ध पाण्याचे वॉटर फिल्टर, ४१ कुटुुंबीयांना स्मार्ट स्टोव्हचे वाटप.
खैराटवाडी
- आदिवासी पाड्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर शासकीय दाखल्यांसाठी शिबिर
- आदिवासी पाड्यावरील व्यक्तींनी व्यसनमुक्त व्हावे, यासाठी भजन कार्यक्रमांचे आयोजन
- गावातील भजन मंडळासाठी साहित्याचे वाटप
मोहोदर व ठाकूरवाडी
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जादुगार हांडे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
सर्व कुटुंबीयांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप
स्मार्ट स्टोव्ह वापरण्यासाठीचे प्रशिक्षण व ६४ कुटुंबीयांना स्टोव्हचे वाटप
तहसीलदार पनवेल कार्यालयाकडून रेशन कार्डसाठीचे शिबिर
फणसवाडी
१४० जणांची संपूर्ण आरोग्य तपासणी
नागरिकांना ब्लँकेट, चटई, दिवाळी फराळ वाटप केले.
गंभीर अजार असलेल्या आदिवासींवर मोफत शस्त्रक्रिया
३२ कुटुंबांना स्मार्ट स्टोव्हचे वाटप
पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणारे दहा विद्यार्थी, दहा विद्यार्थिनी अशा एकूण २० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली.
पालेवाडी व डांगरेश्वरवाडी
आदिवासींसाठी वैद्यकीय शिबिर व मोफत औषधपुरवठा
नागरिकांना ब्लँकेट, चटई व दिवाळी फराळाचे वाटप
१४८ कुटुंबीयांना स्मार्ट स्टोव्ह व ब्लँकेटचे वाटप
नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचे वाटप
१३ कुटुंबीयांना शबरी आदिवासी घरकूल योजनेअंतर्गत घरकूल मंजुरीसाठी पाठपुरावा
दत्तक घेतलेल्या सहा पाड्यांवर हायमास्ट दिवे बसविण्यासाठी पाठपुरावा
पोलीस महासंचालक व आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली सहा आदिवासी पाडे दत्तक घेतले आहेत. या पाड्यांवर सरकारी योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिक्षण, आरोग्य व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे.
- मालोजी शिंदे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
पनवेल, ग्रामीण