- नामदेव मोरे, नवी मुंबई
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश देऊनही तुर्भे नाक्यावरील अतिक्रमण हटविण्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. रोडवर भाजी, फळ विक्रेत्यांसह रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. या परिसरातील मंदिरावर कारवाई करण्यात आली असून तक्रार करूनही अनधिकृत लॉजच्या बांधकामाला मात्र अभय दिले असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबईमध्ये रोड व पदपथावर सर्वाधिक अतिक्रमण तुर्भे नाक्यावर झाले आहे. ठाणे-बेलापूर रोड व एमआयडीसीकडे जाणाऱ्या रोडला लागून हा परिसर आहे. अतिक्रमणांमुळे येथे रोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. नाक्यावरून इंदिरानगरकडे जाणाऱ्या रोडवर उजव्या बाजूला जवळपास ५० फेरीवाल्यांनी कायमस्वरूपी व्यवसाय सुरू केले आहेत. यामध्ये भाजी, फळ व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्यांचा समावेश आहे. पालिकेने तीनपदरी रोड तयार केला आहे, पण यामधील दोन पदरीरोडवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण आले. रोडच्या डाव्या बाजूला चिकन विक्रेत्यांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. रोडवर दोन लेनमध्ये रिक्षा उभ्या असतात. एनएमएमटीच्या बसस्थानकावरही अतिक्रमण झाले असून बस उभी करण्यासाठीही जागा शिल्लक नाही. ठाणे बेलापूर रस्ता ओलांडताना होणारे अपघात थांबविण्यासाठी पालिकेने करोडो रुपये खर्च करून पादचारी पूल बांधला आहे, पण पादचारी पुलावरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. पुलावरून नागरिकांना चालताही येत नाही. पुलाच्या खालीही ३० ते ४० फेरीवाल्यांनी विविध व्यवसाय सुरू केले आहेत. सर्वच दुकानदारांनी मार्जीनल स्पेसमध्ये अतिक्रमण केले आहे. अनेक व्यावसायिकांनी पदपथावर साहित्य ठेवले असल्यामुळे नागरिकांना रोडवरून चालावे लागत आहे. इंदिरानगरकडे जाणाऱ्या रोडवर दोन्ही बाजूला डंपर उभे केले जात आहेत. यामुळेही रोज वाहतूककोंडी होत आहे. डंपरच्या आडून चोरटे रात्री पादचाऱ्यांना लुटत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडील पैसे व इतर साहित्य चोरल्याची घटना घडली आहे. हा परिसर अवैध व्यवसायांचाही अड्डा बनला आहे. गांजा व इतर अमली पदार्थांचीही विक्री या परिसरात सुरू आहे. रोडवर अवैधपणे रॉकेलविक्री सुरू आहे. नागरिकांना रेशनिंगवर रॉकेल मिळत नाही व येथे अवैधपणे विक्री करणाऱ्यांना मुबलक साठा कसा मिळतो? असा प्रश्न रहिवासी विचारू लागले आहेत. ठाणे-बेलापूर रोडवर पूर्वी पादचारी पुलाजवळ बसस्टॉप होता, पण एका हॉटेलचालकाच्या फायद्यासाठी तो २०० मीटर पुढे नेण्यात आला. बसस्टॉपजवळ आयटी पार्कची इमारत बांधल्यामुळे त्यांच्या फायद्यासाठी बसस्टॉप अजून पुढे नेला आहे. नाक्यापासून ५०० मीटरवर बसस्टॉप गेल्याने नागरिकांची गैरसोय होत असून त्याकडेही संबंधित प्रशासन लक्ष देत नाही. रिक्षाचालकांची अरेरावीतुर्भे नाक्यावर रिक्षा चालकांची मनमानी सुरू आहे. मीटरप्रमाणे रिक्षा चालविली जात नाही. महापेकडे जाणाऱ्या रोडवर एकाच वेळी रिक्षामध्ये पाच ते सहा प्रवासी बसविले जात आहेत. चालकाच्या सिटवरही दोन प्रवासी बसविले जात आहेत. मीटरप्रमाणे भाडे आकारण्याची विनंती केली तर भाडे नाकारले जात आहे लायसन्स व बॅच नसणारे व १५ ते १७ वर्षांची मुलेही रिक्षाचालक म्हणून व्यवसाय करत आहेत. वाहतूक पोलिसांच्या समोर हे व्यवसाय सुरू आहेत. रॉकेल येते कोठून नवी मुंबईमध्ये रॉकेल विक्रीचा सर्वात मोठा अड्डा तुर्भे नाक्यावर आहे. रोज ५० ते १०० लिटर रॉकेलची विक्री होत आहे. रविवार व इतर दिवशी हे प्रमाण अजून वाढत आहे. वास्तविक सर्वसामान्य नागरिकांना रेशनिंग कार्डवर वेळेत रॉकेल मिळत नाही, पण काळा बाजार करणारांना नियमितपणे रॉकेल कसे उपलब्ध होते? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. पोलिसांच्या समोरच हा अवैध व्यवसाय सुरू असतानाही कोणीच काही कारवाई करत नाही. शिधावाटप अधिकारीही याकडे दुर्लक्ष करत आहेत. विभाग अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष तुर्भेचे विभाग अधिकारी भरत धांडे असताना नाक्यावर वारंवार कारवाई केली जात होती. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर त्यांनी नाका अतिक्रमणमुक्त केला होता; परंतु अंगाई साळुंखे विभाग अधिकारी झाल्यानंतर फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. दोन लेनमध्ये फेरीवाले बसत असून फक्त एकच लेन वाहतुकीला खुली आहे. लॉजच्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष; मंदिरावर मात्र केली कारवाईतुर्भे विभाग कार्यालयाने इंदिरानगरजवळ रोडच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिरावर कारवाई केली आहे. वाहतुकीला अडथळा नसताना व कोणाचीही तक्रार नसताना मंदिर हटविण्यात आले; पण याच परिसरात शिवसेनेच्या शाखेच्या मागील बाजूला लॉजचे बांधकाम सुरू आहे. या अतिक्रमणाविषयी परिसरातील रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. लेखी तक्रारी करूनही अद्याप कारवाई केलेली नाही. पाच रिक्षा स्टँड तुर्भे नाक्यावरील सर्वात गंभीर समस्या बेशीस्त रिक्षा चालकांमुळे निर्माण झाली आहे. एकाच चौकात पाच रिक्षा स्टँड सुरू आहेत. महापेकडे जाणाऱ्या मार्गावर दोन ठिकाणी, विरूद्ध बाजूला तिन ठिकाणी रिक्षा उभ्या राहात आहेत. चौकामध्ये मध्यभागी व बसस्टॉपच्या समोरील जागेवरही रिक्षा चालकांचे अतिक्रमण असून त्यांच्यावर वाहतूक पोलीसही गांभीर्याने कारवाई करत नाहीत.