नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेने शहरात कचराकुंडीमुक्त अभियान सुरू केले आहे. परंतु महापालिकेच्या या संकल्पनेला शहरवासीयांनी ठेंगा दाखविला आहे. पूर्वी कचराकुंडी असलेल्या ठिकाणांवर कचरा टाकू नये, असे फलक लावले आहेत. परंतु या फलकांकडे दुर्लक्ष करीत सर्रासपणे कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई शहर कचरामुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, अशाप्रकारचे आवाहन केले जात आहे. इतकेच नव्हे तर वसाहतीअंतर्गत असलेल्या सार्वजनिक कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत. त्याजागेवर महापालिकेच्या वतीने फलक लावून कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे. परंतु नागरिकांनी या फलकांकडे डोळेझाक करीत कुंडी असलेल्या जागेवर कचरा टाकणे सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे. सीबीडी, बेलापूर, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली आदी परिसरात हा प्रकार दिसून येतो. दरम्यान, आवाहन करूनही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत महापालिकेच्या संबंधित विभागाने दिले आहेत. (प्रतिनिधी)
कचराकुंडीमुक्त संकल्पनेला ठेंगा
By admin | Published: December 22, 2016 6:44 AM