पनवेलमधील तब्बल ३० उमेदवार कोट्यधीश
By admin | Published: February 15, 2017 04:49 AM2017-02-15T04:49:59+5:302017-02-15T04:49:59+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पनवेल तालुक्यातील आठ मतदारसंघांतील २३ पैकी १३ उमेदवार कोट्यधीश आहेत. तर पंचायत समितीसाठी
मयूर तांबडे / पनवेल
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पनवेल तालुक्यातील आठ मतदारसंघांतील २३ पैकी १३ उमेदवार कोट्यधीश आहेत. तर पंचायत समितीसाठी तालुक्यातील १६ मतदारसंघांमध्ये उभे असलेले ३९ उमेदवारांपैकी १७ उमेदवार कोट्यधीश आहेत.
कोट्यवधींची मालमत्ता असलेल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांमध्ये भाजपा, शेकाप व काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांचा समावेश आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदांसाठी उभे असलेल्या राजेश्री भोपी या महिला उमेदवाराची संपत्ती पन्नास कोटींहून अधिक आहे. जिल्हा परिषदेत शेकापचे ७ तर भाजपाचे ४, अपक्ष १, बसपा १ उमेदवार, तर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उभे असलेले शेकापचे ६, भाजपाचे ८, काँग्रेसचे ३ उमेदवार कोट्यधीश आहेत. उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रासोबत दाखल केलेल्या संपत्ती विवरणाच्या आधारावर ही माहिती मिळाली. पनवेल पंचायत समिती व जिल्हा परिषदेसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान आहे. पनवेलमध्ये भाजपाविरोधात शेकाप काँग्रेस आघाडी अशी लढत होत आहे. नोटाबंदीमुळे ग्रामीण भागात झालेली नागरिकांची आर्थिक कोंडी, शेतकऱ्यांचा खालावलेला आर्थिक दर्जा आणि इतरही महत्त्वाचे मुद्दे या निवडणुकीत चर्चेत आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना संपत्तीचा तपशील उमेदवारांनी दिला आहे. निवडणुकीत उभे असलेल्या भाजपा, काँग्रेस, शिवसेना, शेकापच्या ९ उमेदवारांवर मारहाणीचे, खुनाचा, तसेच दुखापत पोहोचवण्याचे गुन्हे दाखल आहेत. जिल्हा परिषदेतील वावंजे येथील शिवसेनेच्या उमेदवार सविता कातकरी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. पाली-देवद येथील भाजपाचे उमेदवार अमित जाधव यांच्यावर जमाव करून हत्यारानिशी दंगा करून दुखापत पोहोचविण्याचा गुन्हा दाखल आहे. गुळसुंदे येथील शेकापचे उमेदवार राजू गणा पाटील यांच्यावर जाणूनबुजून दुखापत पोहोचवण्याचा एक गुन्हा दाखल आहे.