पनवेलमध्ये तिरंगी लढत?

By Admin | Published: April 27, 2017 12:09 AM2017-04-27T00:09:40+5:302017-04-27T00:09:40+5:30

पनवेल महानगरपलिकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना व भाजपा यांची युती होत नसल्याचे खात्रीशीर

Triplets in Panvel? | पनवेलमध्ये तिरंगी लढत?

पनवेलमध्ये तिरंगी लढत?

googlenewsNext

पनवेल : पनवेल महानगरपलिकेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवसेना व भाजपा यांची युती होत नसल्याचे खात्रीशीर वृत्त असून पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर आपले नशीब आजमावत असणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पनवेलमध्ये शेकाप आघाडी, भाजपा व शिवसेना यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसणार आहे.
प्रथमच होत असलेल्या पनवेल महापालिकेची निवडणूक साऱ्याच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे दोन महिन्यांपासूनच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली होती. शेकापने यापूर्वीच राष्ट्रवादी व काँग्रेससोबत घरोबा करून आघाडी तयार केली आहे. मात्र भाजपा व शिवसेना यांची युती करण्यासाठी भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी प्रयत्न करताना दिसत आहेत. असे असले तरी सेना पक्षप्रमुखांना हे मान्य नसल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर लढून पनवेल महापालिकेत आपली ताकद दाखवून द्या असा आदेश शिवसैनिकांना दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसेना पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळावर मैदानात उतरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे एमआयएम, रासप, स्वाभिमानी शेतकरी, संभाजी ब्रिगेड यांची नवीन मोट बांधली जात आहे. तिसऱ्या आघाडीच्या रूपाने हे पक्ष महापालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेलमध्ये आपले अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत आहे. मनसेचे उमेदवार देखील महापालिकेच्या निवडणुकीसाठी तयार आहेत.
निवडणुकीची घोषणा होऊन पाच ते सहा दिवस उलटून गेलेले असले तरी देखील शेकाप आघाडी व भाजपा यांनी आपापले उमेदवार घोषित केलेले नाहीत. काही दिवसातच हे पक्ष आपले उमेदवार घोषित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण खऱ्या अर्थाने मे महिन्यातच तापणार आहे. रायगड जिल्ह्यातील पहिलीच महापालिका असल्याने या निवडणुकीत सारेच पक्ष आपली ताकद दाखविण्यासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र भाजपा व शिवसेना स्वतंत्र लढल्याने शेकाप आघाडी त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी तालुक्यात व महापालिका क्षेत्रात भारतीय जनता पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेची पहिलीच निवडणूक तिरंगी होणार असल्याचे दिसत आहे. याबाबत शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदेश बांदेकर यांच्याशी संपर्क साधला असता स्वबळाचा निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिकृत अशी कोणतीही घोषणा झालेली नसल्याचे देखील सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Triplets in Panvel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.