लेडीज सर्व्हिस बारविरोधात धाडसत्र
By Admin | Published: October 15, 2015 02:02 AM2015-10-15T02:02:44+5:302015-10-15T02:02:44+5:30
शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. जुगार अड्डे बंद केल्यानंतर आता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लेडीज सर्व्हिस बारवर लक्ष केंद्रित केले आहे
नवी मुंबई : शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. जुगार अड्डे बंद केल्यानंतर आता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लेडीज सर्व्हिस बारवर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत १६ बारवर छापे टाकून तब्बल ८० महिला वेटरवर गुन्हे दाखल केले आहेत.
नवी मुंबई पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त शहाजी उमाप व गुन्हे शाखेचे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सोनसाखळी चोरी, घरफोडीसह अनेक गुन्ह्यांमधील अनेक टोळ्यांना जेरबंद केले आहे. शहरातील सर्व जुगार अड्डे बंद केले आहेत. लॉटरी, मसाज सेंटर, अवैध दारू विक्री व इतर सर्व ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. पोलिसांनी आता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लेडीज सर्व्हिस बारवरही कडक कारवाई सुरू केली आहे. ज्या बारमध्ये नोकरनामा नसतानाही महिला वेटर काम करत असतील तर संबंधितांवर गुन्हे दाखल केले जात आहे. महिला वेटर अश्लील हावभाव करत असतील किंवा इतर अवैध गोष्टी होत असल्याचे निदर्शनास आले तरी तत्काळ कारवाई केली जात आहे. आतापर्यंत तब्बल १६ बारवर कारवाई केली असून अश्लील हावभाव करणाऱ्या व नोकरनामा नसलेल्या ८० महिला वेटरवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पोलीस आयुक्त प्रभात रंजन उपआयुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहन बागडे व त्यांच्या टीमने मंगळवारी दोन ठिकाणी धाडी टाकल्या. कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील बोनकोडे गाव सेक्टर १२ मधील स्वागत बारवर छापा टाकला. या छाप्यात ६ महिला वेटर गैरवर्तन करत असल्याचे निदर्शनास आले. हॉटेलमधील नोकरनामे तपासले असता या महिलांचा तपशील नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनच्या समोरील नीलम बारवरही धाड टाकली.
सदर ठिकाणी तीन महिला गैरवर्तन करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम ११० व ११७ अन्वये कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलीस हवालदार संतोष शिंदे, विनोद भोईर, सचिन शेरमकर, विनोद चौधरी, सचिन कोठूळे, तस्लीम पठाण, अमोल भोसले, रितेश धाडकर यांनी सहभाग घेतला होता. पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवाईचे शहरावासीयांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)