ट्रकचालकांच्या आंदोलनाला नवी मुंबईत हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक, ४० जण ताब्यात
By सूर्यकांत वाघमारे | Published: January 1, 2024 05:42 PM2024-01-01T17:42:04+5:302024-01-01T17:42:19+5:30
या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अवजड वाहनांच्या चालकांनी केलेल्या रस्ता रोकोच्या ठिकाणी पोलिसांवर गडफ़ेक केल्याची घटना जेएनपीटी मार्गावर घडली. यामध्ये काही पोलिस जखमी झाले असून याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी ४० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात काही वेळासाठी तणाव होता.
अपघात करून पळणाऱ्या चालकांवर कठोर कारवाईसाठी कायदा करण्यात आला आहे. या कायद्याला वाहन चालकांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. त्यासाठी सोमवारी सकाळी जेएनपीटी मार्गावर उलवे येथे वाहन चालकांनी रास्ता रोको केला होता. अचानक झालेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे त्याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे एनआरआय पोलिसांचे पथक त्याठिकाणी गेले होते. यावेळी त्यांनी आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलक चालकांनी पोलिसांवर तसेच रस्त्यांवरील वाहनांवर दगडफेक करण्यास सुरवात केली. यामध्ये काही वाहनांचे नुकसान झाले तर काही पोलिसही जखमी झाले आहेत. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना देखील बळाचा वापर करावा लागला. त्यामध्ये चाळीस आंदोलकांना ताब्यात घेतले असल्याचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. त्यांच्यावर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान शासन निर्णयाविरोधात आंदोलन करताना चालकांनी कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये असे आवाहनही उपायुक्त पानसरे यांनी केले आहे.
या घटनेमुळे उलवे परिसरात तणाव निर्माण होऊन उलवे मार्गे जाणारी वाहने पामबीच व पर्यायी मार्गाने वळवली जात होती. यामुळे अनेक ठिकाणी अचानक वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. तर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर सदर मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.