सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - एपीएमसी आवारातील ट्रक टर्मिनलमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत, यामुळे भविष्यात त्या ठिकाणी घडलेली छोटीशी आगीची घटना मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते. मात्र, अग्निशमन विभागाने अनेकदा सूचना करूनही तिथल्या वाहनांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे.एपीएमसी ही आशिया खंडातली सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने त्या ठिकाणी येणारी मालाची वाहने उभी करण्यासाठी सिडकोने ट्रक टर्मिनल उभारले आहे. यानुसार सद्यस्थितीला त्या ठिकाणी शेकडो ट्रक, टेम्पो दिवस-रात्र उभे असतात. राज्याबाहेरून एपीएमसीत माल घेऊन आलेल्या वाहनांसाठी हे टर्मिनल सोयीचे ठरत आहे; परंतु काही त्रुटींमुळे हे टर्मिनल भविष्यात मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकते. तशी शक्यताही अग्निशमन विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. मात्र, सिडको प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ट्रक टर्मिनलमधील परिस्थितीत सुधार केला जात नसल्याने संपूर्ण एपीएमसी, वाशी परिसरावर धोक्याची घंटा कायम आहे. त्या ठिकाणी ट्रक, टेम्पो, तसेच ट्रेलर अशी मालवाहू वाहनेच उभी करणे आवश्यक आहे. त्यासाठी देखील अधिकाधिक ७२ तासांचा अवधी निश्चित करण्यात आलेला आहे. यानंतरही ट्रक टर्मिनलमध्ये ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेले टँकर उभे केले जात आहेत, त्यापैकी काही टँकर महिनोंमहिने त्या ठिकाणी उघड्यावर पडून राहत असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यापैकी एका जरी टँकरने पेट घेतल्यास ट्रक टर्मिनलमधील इतरही वाहने जळून खाक होऊ शकतात. त्यामुळे एपीएमसी बाजारपेठेसह वाशी सेक्टर १७ व लगतच्या परिसरालाही धोका उद्भवू शकतो.टर्मिनलमध्ये वाहनांच्या दुरुस्तीला बंदी असतानाही अनेक वाहनांची दुरुस्ती केली जाते. त्याकरिता टर्मिनलच्या भिंतीलगतच अनधिकृत गॅरेजची दुकानेही थाटलेली आहेत. यापूर्वी त्या ठिकाणी दुरुस्तीच्या वाहनांना आग लागल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी टर्मिनलमध्ये अग्निशमन यंत्रणा बसवण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत. यानंतरही सिडकोकडून ट्रक टर्मिनलची सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आलेली आहे. पार्क करण्यासाठी येणाºया ट्रक, टँकरमध्ये नेमके काय आहे, याची माहिती न घेताच अवघ्या २०० रुपयांसाठी प्रत्येक वाहनाला आत प्रवेश दिला जात आहे. तर आत प्रवेश केल्यानंतर ही वाहने नियोजित जागेऐवजी इतरत्र कुठेही उभी केली जातात. याचा परिणाम आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन दलाच्या मदतकार्यावर होत आहे. मंगळवारी रात्री टर्मिनलमधील दोन टेम्पोला आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी वाशीचे अग्निशमन दल त्या ठिकाणी गेले असता, वेड्यावाकड्या पद्धतीने उभ्या वाहनांमुळे त्यांना पेटलेल्या टेम्पोपर्यंत वेळेत पोहोचता आले नाही, याच वेळी ज्वलनशील पदार्थांचा साठा असलेले दोन टँकर वेळीच बाजूला हटवल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. मात्र, भविष्यात पुन्हा अशी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.ट्रक टर्मिनलमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना आग लागल्याच्या घटना सतत घडत आहेत. अशा दुर्घटनांमुळे संपूर्ण एपीएमसी परिसराला धोका आहे. यासंदर्भात सिडको व एपीएमसी प्रशासनाला आवश्यक ठिकाणी अग्निरोधक यंत्रणा बसवण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत.- अमृतानंद बोराडे,अग्निशमन अधिकारी (वाशी प्रभारी)टर्मिनलमध्ये वाहनाला प्रवेश देताना त्याच्या चालक अथवा वाहकाचा नंबर नोंद करून घेतला जात नाही, यामुळे आपत्कालीन प्रसंगी ते वाहन हटवायचे झाल्यास संपर्क कोणाशी साधायचा, असा प्रश्न पडत आहे. तर काही वाहने महिनोंमहिने त्या ठिकाणी पडून असतानाही संबंधितांच्या माहितीअभावी ती हटवण्यात आलेली नाहीत.वाहतूक पोलिसांचेही दुर्लक्षपार्किंगचे पैसे वाचविण्यासाठी चालकांकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. यामुळे ट्रक टर्मिनलभोवतीचे रस्तेही अवैध पार्किंगच्या विळख्यात सापडले आहेत. यामुळे चोरी, हत्या अशा गुन्हेगारी घटना घडत आहेत; परंतु वाहतूक पोलिसांच्या चौकीलगतच रस्त्यावर अवैध पार्किंग होत असतानाही त्यावर कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.टॉयलेटमध्ये स्वयंपाकघरटर्मिनलचे कर्मचारी व चालकांनी तिथल्या टॉयलेटमध्येच बस्तान मांडले आहे. त्या ठिकाणी जेवण बनवण्याकरिता स्टोव्ह व गॅसच्या शेगडींचा वापरही केला जातो. अशा वेळी एखादा निष्काळजीपणाही दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकतो.
ट्रक टर्मिनलमुळे एपीएमसीची सुरक्षाही धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 5:01 AM