वितरकाला लुटण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 15, 2017 04:54 AM2017-02-15T04:54:56+5:302017-02-15T04:54:56+5:30
मोबाइल सिमकार्ड कंपनीच्या वितरकाला लुटण्यासाठी आलेल्या टोळीच्या दोघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. पिस्तूलचा
नवी मुंबई : मोबाइल सिमकार्ड कंपनीच्या वितरकाला लुटण्यासाठी आलेल्या टोळीच्या दोघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. पिस्तूलचा धाक दाखवून ते लुटण्याचा प्रयत्न करत असतानाच वितरकाने केलेल्या प्रतिकारामुळे व नागरिकांच्या धाडसामुळे दोघांना अटक झाली आहे. त्यापैकी एकावर यापूर्वी कुर्ला येथे गुन्हा दाखल आहे.
राजू माळी या मोबाइल सिमकार्ड वितरकासोबत सोमवारी रात्री हा प्रकार घडला. नेरूळ सेक्टर ८ येथे राजीव गांधी पुलालगत त्यांचे कार्यालय असून दररोज ते शहरातून सिमकार्ड विक्रीची जमा झालेली रक्कम घेवून जायचे. सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे ५५ हजार रुपयांची रक्कम घेवून गाडीमध्ये बसत असताना अज्ञात तिघे जण त्यांच्या कारमध्ये घुसले. त्यापैकी एकाने माळी यांना पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रकमेची पिशवी खेचून पळ काढला. मात्र माळी यांनी त्यापैकी एकाला धरून ठेवत आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. याचवेळी त्याठिकाणावरून जाणाऱ्या नेरूळ पोलिसांच्या बिट मार्शल कर्मचाऱ्यांना हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी नागरिकांच्या मदतीने इतर एकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोघांच्या झडतीमध्ये त्यांच्याकडून गावठी कट्टा व माळी यांची लुटलेली रक्कम आढळून आली. प्रेसित नार्वेकर व सागर कुरणे अशी त्यांची नावे असून नार्वेकर हा कुलाबा येथील तर कुरणे हा ठाण्याचा राहणारा आहे. त्यांच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नार्वेकर याच्यावर यापूर्वीचा कुर्ला पोलीस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले. तर कुरणे हा ओला कारचा चालक असून दरोड्यानंतर माळी यांची कार चालवण्यासाठी त्याचा वापर केला जाणार होता. माळी यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्याकडून दरोड्याचा हा प्रयत्न झाल्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)