पक्ष्यांना उष्माघातापासून वाचविण्यासाठी प्रयत्न
By admin | Published: April 24, 2017 02:35 AM2017-04-24T02:35:30+5:302017-04-24T02:35:30+5:30
सीबीडी सेक्टर ९ परिसरातील ग्रीन व्हॅली पार्क परिसरातील सर्व झाडांना पाण्याने भरलेले प्लास्टीकचे भांडे लावण्यात आले आहे.
नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ९ परिसरातील ग्रीन व्हॅली पार्क परिसरातील सर्व झाडांना पाण्याने भरलेले प्लास्टीकचे भांडे लावण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेमुळे पक्ष्यांची पाण्याची तहान भागविण्याकरिता या परिसरातील २० हून अधिक झाडांना अशा प्रकारचे भांडे लटकविण्यात आले आहे. जेणेकरून झाडावर विश्रांती घेण्याबरोबरच पक्ष्यांची पाण्याची तहानही भागविता येऊ शकते.
ग्रीन व्हॅली पार्कमध्ये सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनही वेळेस बहुसंख्य नागरिक जॉगिंग तसेच व्यायामासाठी येतात. याठिकाणी शेकडो झाडे पहायला मिळत असून याठिकाणी व्यायामासाठी येणारे नागरिक आवर्जून झाडांना पाणी घालतात. प्लास्टीकचे रिकामे डब्यांना दोरी तसेच तारेने बांधून ही भांडी झाडांच्या फांदीवर लटकविण्यात आली आहे. याठिकाणी येणारे निसर्गप्रेमी आवर्जून येथील झाडे तसेच झाडांना लावण्यात आलेल्या भांड्यांमध्ये पाणी घालतात. याठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली जात असून ज्येष्ठ नागरिक, निसर्गप्रेमी या सर्व झाडांची देखभाल करतात. वर्षभरात याठिकाणी ५० हून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये फळ झाडे, औषधी वनस्पतींचा समावेश आहे. परिसरातील निसर्गप्रेमी येथील वृक्षसंपत्तीची देखभाल घेत असून झाडांना पाणी घालणे, छाटणी करणे आदी कामेही या नागरिकांकडून केली जात आहेत. टाकाऊ प्लास्टीकची भांडी, डबे आदींचा वापर करून पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी निसर्गप्रेमींना स्वत: पाणी साठविण्याची भांडी तयार केली आहेत. नागरिकांनी घरातील खिडक्या, टेरेस,उंचावरील मोकळ्या जागेत पक्ष्यांची तहान भागविण्याकरिता पाण्याने भरलेली भांडी ठेवण्याचे आवाहन ग्रीन व्हॅली पार्कमधील वॉकर्स असोसिएशनच्या नागरिकांनी केले आहे.