लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. खाली कर्नाटकातही घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. जात, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्याशरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.
डॉ. मंगेश आमले यांनी येथे आयोजित केलेल्या सामाजिक ऐक्य परिषदेमध्ये शरद पवार यांनी भूमिका मांडली. देशाच्या विविध भागांत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातही तसेच होते की काय, अशी स्थिती आहे. ऐक्य निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण, सरकार तसे काम करीत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्रात अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांनी समतेचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी रयतेचे राज्य निर्माण केले. त्यांच्या राज्याभिषेकालाही काहीजणांनी विरोध केला. तोच वर्ग आज सामाजिक ऐक्याला धक्का देतोय. सर्वांनी एक होऊन सामाजिक ऐक्य टिकविले पाहिजे. आज देश एकसंघ आहे तो संविधानामुळे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. बाबासाहेबांनी देशविकासासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या विचारातूनच भाक्रा नानगलसारखी धरणे तयार झाली. पाण्यापासून वीजनिर्मितीला सुरुवात झाली. त्यांनी समतेचा विचार रुजवला. महात्मा फुले, शाहू महाराज यांनीही समता रुजविली, तो विचार टिकविण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
महायुतीने प्रत्येक मतदारसंघात पैसे वाटले : रोहित पवार
समाजामध्ये भांडणे लावण्याचे काम काही व्यक्ती करत आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने प्रत्येक मतदारसंघामध्ये ६० कोटी वाटले. काही ठिकाणी १०० कोटी, तर काही ठिकाणी १५० कोटी खर्च केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. प्रचंड पैसे खर्च करूनही जनतेने त्यांना सामान्य माणसांची ताकद दाखवून दिली, असे मत व्यक्त केले.