लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐरोली सेक्टर-८मधून जाणाऱ्या मुख्य नाल्यात डेब्रिजचा भराव टाकून या नाल्याचा प्रवाह बदलण्याचे प्रयत्न काही भूमाफियांकडून सुरू आहेत. या प्रकाराला महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाकडून अप्रत्यक्षपणे अभय मिळत असल्याने पावसाळ्यात या परिसरातील वसाहतीत पाणी साचण्याची भीती रहिवाशांकडून व्यक्त होत आहे.मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाचा यावर्षी पुरता फज्जा उडाला आहे. अनेक ठिकाणी नालेसफाईच्या कामांचा केवळ सोपस्कार केल्याचे दिसून आले आहे. ऐरोली, दिघा परिसरांत या कामांचा बोजवारा उडाला आहे. तर या वेळी शहरातील मोठ्या नाल्यांच्या सफाईला प्रशासनाने बगल दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात हे नाले तुंबून त्यातील पाणी शेजारच्या वसाहतीत घुसण्याची भीती व्यक्त होत आहे. ऐरोली परिसरात तर हा धोका गंभीर बनल्याचे चित्र आहे. येथील सेक्टर-८मधून जाणाऱ्या मुख्य नाल्यात मागील काही दिवसांपासून सर्रासपणे डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत. त्यामुळे नाल्याचा प्रवाह बदलला आहे. महापालिकेतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही भूमाफियांनी या नाल्यात भराव टाकण्याचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात डोंगर भागातून वाहणाऱ्या पाण्याचा निचरा या नाल्यातून केला जातो; परंतु बेकायदा डेब्रिज टाकल्याने नाल्याचा प्रवाहच बदलल्याने याचा फटका शेजारच्या वसाहतींना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकाराकडे महापालिकेचा संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. डेब्रिजच्या गाड्या पकडून दिल्या, तरी नंतर त्या सोडून दिल्या जातात. एकूणच डेब्रिजविरोधी पथकाच्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे भूमाफिया सुसाट सुटल्याचा आरोप राजेश मढवी या ग्रामस्थाने केला आहे.
डेब्रिजच्या भरावाने नाल्याचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न
By admin | Published: June 15, 2017 3:17 AM