खेळाचे मैदान हडपण्याचा प्रयत्न

By admin | Published: September 27, 2016 03:13 AM2016-09-27T03:13:57+5:302016-09-27T03:13:57+5:30

खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेला भूखंड हडपण्याचा प्रयत्न घणसोली येथे सुरू आहे. त्याकरिता संबंधिताने परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या जलवाहिनीवर देखील मातीचा

Trying to grab a play ground | खेळाचे मैदान हडपण्याचा प्रयत्न

खेळाचे मैदान हडपण्याचा प्रयत्न

Next

नवी मुंबई : खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेला भूखंड हडपण्याचा प्रयत्न घणसोली येथे सुरू आहे. त्याकरिता संबंधिताने परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या जलवाहिनीवर देखील मातीचा भरणा केलेला आहे. परंतु या संपूर्ण अनधिकृत बांधकामाकडे सिडको व पालिका अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षाचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.
घणसोली सेक्टर ५ येथील नाल्यालगतचा भूखंड सिडकोने संबंधिताला सिलिंडर गोडाऊनसाठी दिलेला आहे. मात्र सध्या त्याठिकाणी तीन मजली इमारत उभी असून त्यामध्ये शाळा भरवली जात आहे. सिडकोने ज्या वापरासाठी हा भूखंड दिलेला आहे, त्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी हा भूखंड वापरला जात आहे. यासंदर्भात यापूर्वी अनेकांनी सिडको व पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही सदर बांधकामावर कारवाई झालेली नाही. अशातच संबंधिताने त्या भूखंडालगतच असलेले खेळाचे मैदान देखील बळकावण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. काही दिवसांपूर्वी सिलिंडर गोडाऊनचा भूखंड व खेळाचे मैदान यादरम्यानची भिंत तोडण्यात आलेली होती. त्यानंतर दिवसाढवळ्या खेळाच्या मैदानाचा निम्म्याहून अधिक भाग ताब्यात घेवून भिंत बांधण्याचे काम त्याठिकाणी सुरु आहे. याशिवाय संबंधिताने नाल्यालगतच्या जलवाहिनीवर देखील मातीचा भरणा करुन ताब्यातील भूखंडाचे क्षेत्र वाढवले आहे. तर त्याठिकाणी भूमिगत जलवाहिनी होती हे कोणाच्या नजरेस येवू नये याकरिता जलवाहिनीच्या भागावर झाडे लावण्यात आली आहेत. यामुळे भविष्यात जलवाहिनी फुटल्यार्स परिसराचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.
घणसोलीतील नागरिकांना खेळाचे मैदान, उद्यान, शासकीय रुग्णालय अशा सुविधांपासून गेली १५ वर्षांपासून वंचित राहावे लागले आहे. अशातच नागरी सुविधांचे भूखंड बळकावले जाऊ लागल्याचा संताप स्थानिक रहिवासी राजू गावडे यांनी व्यक्त केला आहे. सुविधांच्या अभावी रहिवाशांचा प्रशासनाप्रति रोष वाढत चालला आहे. मैदाने, उद्यान यासाठी भूखंड राखीव असतानाही त्याचा विकास झालेला नाही. त्यामुळेच भूखंड हडपण्याचे प्रकार घडत असून, त्याकडे दोन्ही प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचाही संताप त्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे या विरोधात उपोषण केले जाणार असून भूखंड हडपणाऱ्या संबंधितांवर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचेही गावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Trying to grab a play ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.