महापौर बंगल्याविषयी माहिती लपविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2015 01:57 AM2015-10-18T01:57:55+5:302015-10-18T01:57:55+5:30
पारसिक हिलवरील महापौर बंगल्याच्या देखभालीसाठी किती खर्च होत आहे, त्याचा वापर कोण करते, असा लेखी प्रश्न शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी सर्वसाधारण
नवी मुंबई : पारसिक हिलवरील महापौर बंगल्याच्या देखभालीसाठी किती खर्च होत आहे, त्याचा वापर कोण करते, असा लेखी प्रश्न शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी सर्वसाधारण सभेत विचारला होता. परंतु प्रशासनाने उत्तर देण्याचे टाळल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माहिती न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर १९९६ मध्ये पारसिक हिलवर महापौर बंगला बांधण्यात आला. २००५ नंतर या ठिकाणी महापौर पूर्णवेळ वास्तव्यास गेले नाहीत. यामुळे सदर बंगल्याचा वापर कोण करते, त्याच्या देखभालीवर किती खर्च होतो, याविषयी नेहमीच चर्चा होत असते. याविषयी वास्तव माहिती समोर यावी, यासाठी माजी सिडको संचालक व नगरसेवक नामदेव भगत यांनी महासभेमध्ये लेखी प्रश्न विचारला होता. या बंगल्याचा वापर महापौरांसाठीच होत आहे का, महापौर निवासामध्ये किती कर्मचारी आहेत, देखभालीसाठी किती खर्च होतो, सदर ठिकाणी सीसी टीव्ही बसविण्यात आले आहेत का, अशी विचारणा केली होती. परंतु या प्रश्नांची उत्तर आयुक्तांनी दिलीच नाहीत. यामुळे भगत यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. महापौर पारसिक हिलच्या बंगल्यावर राहतच नाहीत. त्या वास्तूचा वापर दुसरेच कोणीतरी करीत असल्याची शक्यता व्यक्त केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी मी त्या ठिकाणी जातो असे सांगितले, परंतु तुमच्या वाहनाच्या नोंदीमध्ये कधीच महापोर बंगल्यावर गेल्याचा उल्लेख नसल्याचे भगत यांनी सांगितले. यानंतर महापौरही निरुत्तर झाले. प्रशासनाने महापौर बंगल्याविषयी माहिती दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिला. अर्धा तास याविषयी चर्चा सुरू होती. विरोधक आक्रमक होऊ लागल्यामुळे अखेर महापौरांनी सभा गुंडाळली. सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना भगत यांनी प्रशासनावर टीका केली. महापौर बंगल्यावर सुरक्षेसाठी कॅमेरे बसविणे आवश्यक आहे. त्याच्या देखभालीसाठी किती खर्च होतो व त्याचा वापर कोण करते, याची माहिती नागरिकांना मिळालीच पाहिजे. प्रशासनाने जर याविषयी माहिती दिली नाही तर शासनाकडेही तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.