टीटीसी औद्योगिक क्षेत्राला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:22 AM2018-06-29T03:22:47+5:302018-06-29T03:22:51+5:30

आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्राची ओळख आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या क्षेत्रातील उद्योजकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे

TTC solve problems in the industrial sector | टीटीसी औद्योगिक क्षेत्राला समस्यांचा विळखा

टीटीसी औद्योगिक क्षेत्राला समस्यांचा विळखा

Next

अनंत पाटील  
नवी मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्राची ओळख आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या या क्षेत्रातील उद्योजकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अतिक्रमण, रस्ते, दिवाबत्ती, पाण्याची गळती, गटारे, ड्रेनेजची समस्या आदी पायाभूत सुविधांची येथे दैना उडाली आहे. त्यामुळे येथील उद्योजक हवालदिल झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे येथील उद्योगधंदे डबघाईला आल्याने या क्षेत्रातील अनेक लहान-मोठे उद्योग बंद होत आहेत. याचा अप्रत्यक्ष फटका या क्षेत्रातील रोजगारावर होत आहे.
ऐरोली, रबाले, महापे, खैरणे, पावणे, तुर्भे आणि नेरूळ या टीटीसी क्षेत्रात मुख्य व अंतर्गत असे एकूण ९५ कि.मी लांबीचे रस्ते आहेत. या संपूर्ण क्षेत्रात ४,८0५ लहान-मोठे औद्योगिक युनिट आहेत. त्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सुमारे दोन लाख रोजगार आहेत. मात्र एमआयडीसी प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे या क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. अत्यावश्यक सुविधांअभावी मागील दहा वर्षात येथील अनेक कारखान्यांनी
गाशा गुंडाळून अन्यत्र स्थलांतर केले आहे.
एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत होत आहे. रबाले एमआयडीसी क्षेत्रातील २१ कि.मी. अंतरापर्यंतचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी २३५ कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. परंतु आठ महिने झाले तरी यासंदर्भात कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. विशेष म्हणजे खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

बंद पथदिव्यांमुळे अंधाराचे साम्राज्य
रस्ते खड्डेमय आहेतच, यात रस्त्यावरील पथदिवेसुध्दा गायब झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण एमआयडीसी क्षेत्रात अंधाराचे साम्राज्य असते. त्याचा फायदा गुन्हेगारी प्रवृत्तींनी घेतला आहे. त्यामुळे चोऱ्या व लुटमारीच्या घटनात वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी येथील चाकरमान्यांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. विशेषत: महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या क्षेत्रात कचºयाचा मोठा प्रश्न आहे. दैनंदिन कचºयाची नियमित विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्याचे दिसून येते. पावसामुळे या कचºयातून दुर्गंधी येत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेब्रिजमाफियांना एमआयडीसीतील मोकळे भूखंड आंदण ठरले आहेत. या भूखंडांवर बेमालूमपणे डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या जात आहेत.

एमआयडीसीचे सरासरी क्षेत्रफळ ९५ कि.मी. इतके आहे. यापूर्वी नवी मुंबई महापालिकेने यातील ५0 टक्के क्षेत्रात विकासकामे केली आहेत. उर्वरित कामासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे काही महिन्यात येथील समस्या संपुष्टात येतील. बेकायदा झोपड्यांवर पावसाळ्यानंतर कारवाई केली जाईल.
- एम.एस.कलकुटकी,
कार्यकारी अभियंता,
एमआयडीसी महापे,नवी मुंबई.

एमआयडीसीतील उद्योजकांकडून महापालिका कोट्यवधींचा मालमत्ता कर वसूल करते. मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे येथील लहान-मोठे उद्योजक त्रस्त झाले आहेत. गटारे व मलनिस्सारण वाहिन्या तुंबलेल्या आहेत. ही कामे उद्योजकांना स्वखर्चातून करावी लागत आहे. याप्रकरणी दोन्ही प्राधिकरणांनी सकारात्मक तोडगा काढण्याची गरज आहे.
- के. आर. गोपी,
अध्यक्ष, टीटीसी इंडस्ट्रीज असोसिएशन.

Web Title: TTC solve problems in the industrial sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.