बीपरजॉय चक्रीवादळाच्या तडाख्यात करंजा येथील ठेकेदाराची टगबोट आणि बार्ज किनाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 05:13 PM2023-06-12T17:13:34+5:302023-06-12T17:15:16+5:30
या व्यतिरिक्त उरण परिसरातील किनारपट्टीवरील गावात चक्रीवादळामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती उरण नायब तहसीलदार जी.बी.धुमाळ यांनी दिली.
मधुकर ठाकूर -
उरण : संभाव्य येऊ घातलेल्या बीपरजॉय चक्रीवादळाच्या तडाख्यात रविवारी (११) संध्याकाळी करंजा रो-रो जेट्टीवर काम करीत असलेल्या एका ठेकेदाराची एक टगबोट व एक बार्ज जागच्या जागीच भरकटली. या व्यतिरिक्त उरण परिसरातील किनारपट्टीवरील गावात चक्रीवादळामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याची माहिती उरण नायब तहसीलदार जी.बी.धुमाळ यांनी दिली.
संभाव्य येऊ घातलेल्या बीपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यातील सर्वच किनारपट्टीवरील गावं आणि मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.एक जून पासून पावसाळी मासेमारी बंदीनंतर हजारो मासेमारी नौका उरण परिसरातील विविध बंदरात याआधीच नांगर टाकून विसावा घेत आहेत.तर संभाव्य येऊ घातलेल्या बीपरजॉय चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील गावे सावधगिरीच्या इशाऱ्यामुळे ॲलर्ट मोडवर आहेत.समुद्रात खवळलेल्या लाटा आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास करंजा रो - रो जेट्टीवर येथेच काम करणाऱ्या ठेकेदाराची एक टगबोट व एक बार्ज जागच्या जागीच भरकटून त्याच किनाऱ्यावर लागली आहे.यामध्ये कोणालाही दुखापत अथवा कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची पाहणीतून आढळून आले असल्याची माहिती उरण नायब तहसीलदार जी.बी.धुमाळ यांनी दिली.
तसेच उरण परिसरातील किनारपट्टीवरील कोणत्याही गावात किंवा नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याचेही धुमाळ यांनी सांगितले.तर मोरा सागरी किनाऱ्यावर शेकडो बोटी पावसाळी मासेमारी बंदीमुळे विसावा घेत आहेत.या ठिकाणीही चक्रीवादळामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची घटना घडली नसल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक प्रकाश कांदळकर यांनी दिली.