लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मागे चौकशीचा ससेमीरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये त्यांच्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार टीका केली. मुंढे यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्यासाठी १५ सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी मुंढे यांच्या चौकशीचा प्रस्ताव मांडला. माजी आयुक्तांनी मे २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीमध्ये अनेक निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांचे पालनही काटेकोरपणे झालेले नाही. त्यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांची व नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या स्तरावरील खातेनिहाय चौकशी (महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २०११मध्ये कलम ५६मधील तरतुदी अन्वये) स्थायी समिती यांच्याकडे करावयाचे अपिल, तसेच कलम ५३ (१)अंतर्गत मंजूर करावयाची स्वेच्छा निवृत्ती इतर विषयांवरील कायदेशीर तरतुदींचा अभ्यास करून समर्पक निर्णय घेण्याकरिता चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी इथापे यांनी केली. बहुतांश सर्वच नगरसेवकांनी मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करून सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी केली. शिवसेनेचे किशोर पाटकर यांनी मुंढे यांच्यामुळे शहरवासीयांचे नुकसान झाले आहे. एमएमआरडीए क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डीसीआर तयार करण्यात येणार होता. त्यामधून नवी मुंबईला वगळण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी घेतली. एमएमआरडीएच्या डीसीआरमुळे प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा विकास करणे शक्य होणार होते. वाशीतील कोपरी येथे धोकादायक इमारतीविषयी आयआयटीचा अहवाल ग्राह्य धरला नसल्याने रहिवाशांचे नुकसान झाले. पुनर्बांधणीसाठी ५१ टक्के रहिवाशांची सहमती आवश्यक असताना १०० टक्के सहमतीचा आग्रह धरण्यात आला. माजी आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या निर्णयावर शंका घेणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले. फेरीवाल्यांपासून अनेक निर्णय चुकविल्यामुळे शहराचे नुकसान झाले असून त्यांची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. मुंढे यांच्या कार्यकाळात चुकीच्या पद्धतीने कामकाज करण्यात येत होते. पालिकेची नाहक बदनामी झाल्याने कामाची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत नामदेव भगत यांनी व्यक्त केले. शिवसेनेच्या संजू वाडे यांनी आंबेडकर भवनच्या डोमला मार्बल लावण्यास मुंढे यांनी विरोध दर्शवल्याने भवनचे काम रखडल्याची टीका केली. महापौर सोनावणे यांनी मुंढे यांची चौकशी करण्यासाठी १५ जणांची समिती नेमण्याची घोषणा केली. बदली झाल्यानंतरही माजी आयुक्तांचे व लोकप्रतिनिधींमधील भांडण संपले नसल्याचे स्पष्ट झाले असून या चौकशीतून काय निघणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. यामुळे १५ सदस्यीय समिती गठीत केली जाणार आहे. यामध्ये सर्वपक्षीय नगरसेवकांबरोबर दोन तज्ज्ञ सदस्यांचा समावेश असणार आहे. तज्ज्ञ सदस्यांमध्ये निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार असून तो अहवाल शासनाकडे पाठविला जाईल. - सुधाकर सोनावणे, महापौर मे २०१६ ते मार्च २०१७ या काळात मुंढे यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त आहेत. त्यांच्या निर्णयांमुळे पालिकेचे नुकसान व बदनामी झाली असल्याची शक्यता आहे. यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयांची सखोल चौकशी व्हावी. - रवींद्र इथापे, नगरसेवक, राष्ट्रवादीमुंढे यांच्या कार्यकाळात अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर झाला पाहिजे. त्यांच्या काळात पालिकेची देशभर बदनामी झाली असून, त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी झालीच पाहिले. - नामदेव भगत, नगरसेवक, शिवसेनामुंढे यांनी मनमानीपणे कामकाज केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यासही विरोध केला. अनेक वादग्रस्त निर्णय घेतले असून त्याची चौकशी व्हावी. - संजू वाडे, नगरसेवक, शिवसेना
तुकाराम मुंढेंच्या निर्णयांची होणार चौकशी
By admin | Published: June 21, 2017 5:54 AM