नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथील पालिकेच्या शाळेसमोरच कचºयासह डेब्रिजचे ढीग साचले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे; परंतु यासंदर्भात तक्रार करून देखील कचरा व डेब्रिजचे ढीग हटवले जात नसल्याने झोपडपट्टी भागातील स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून शहरात विविध संकल्प राबवले जात आहेत. त्यावर पालिकेकडून लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र पालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छतेच्या बाबतीत दुजाभाव होत असल्याचा आरोप तुर्भे इंदिरानगर परिसरातील रहिवाशांकडून होत आहे. त्याठिकाणच्या पालिका शाळेबाहेरच अनेक दिवसांपासून कचरा व डेब्रिजचा ढीग साचला आहे. अज्ञात व्यक्तीकडून हे डेब्रिज त्याठिकाणी टाकण्यात आले आहे. तर परिसरात कचराकुंडी नसल्याने काही व्यक्तींनी त्यावरच कचरा टाकून आरोग्याचा प्रश्न निर्माण केला आहे. याचा सर्वाधिक त्रास त्याठिकाणी येणाºया विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. सदर ठिकाणी एकाच इमारतीत पालिकेची २५ व ७१ क्रमांकाची शाळा असून, दररोज शेकडो विद्यार्थ्यांना हा कचरा पायदळी तुडवावा लागत आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रार करून देखील तिथला कचरा हटवला जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश कोठीवाले यांनी केला आहे.
तुर्भे एमआयडीसीतील मनपा शाळेसमोरच कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:38 AM