तुर्भेत मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, एपीएमसीमध्ये गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:29 AM2018-07-06T03:29:40+5:302018-07-06T03:29:49+5:30
तुर्भे गावामध्ये बुधवारी रात्री अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
नवी मुंबई : तुर्भे गावामध्ये बुधवारी रात्री अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग व अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी दिवसभर पोलिसांनी परिसरामध्ये झाडाझडती सुरू केली होती.
रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपीने अल्पवयीन मुलीला वडिलांनी बोलावले असल्याचे सांगून माता बाल रूग्णालय परिसरामध्ये नेले. तेथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरोपीच्या हाताला चावा घेवून स्वत:ची सुटका करून घेतली. या घटनेविषयी माहिती मिळताच तुर्भे परिसरामध्ये खळबळ उडाली. गावातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. ही घटना गंभीर असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एपीएमसी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात विनयभंग व अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दिवसभर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त तुषार दोशी, परिमंडळ एकचे उपआयुक्त, सहायक आयुक्त, नेरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी परिसराची पाहणी केली. गावामधील सीसीटीव्हीचे फुटेजही ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपीचा तपास सुरू केला आहे. स्थायी समितीच्या माजी सभापती नगरसेविका शुभांगी पाटील, शशिकला पाटील, भाजपा नगरसेवक रामचंद्र घरत, माजी नगरसेवक विवेक पाटील, सामाजिक कार्यकर्ते भोलानाथ पाटील यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांनीही पोलिसांना तपासासाठी आवश्यक सीसीटीव्हीचे चित्रीकरण मिळवून देण्यासाठी सहकार्य केले. गुरुवारी दिवसभर शोधकार्य सुरू होते. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबईमध्ये कोपरखैरणे, नेरूळ व इतर परिसरामध्ये मुलींचा विनयभंग झाल्याच्या व छेडछाडीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामधील दोन संशयितांची छायाचित्रेही पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. यामधीलच एका आरोपीने हा गुन्हा केला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुर्भे गावामध्ये घडलेल्या घटनेविषयी विनयभंग व अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दिवसभर परिसरातील सीसीटीव्हीचे छायाचित्रण ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
- सतीश निकम,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ही गंभीर घटना असून पोलिसांनी आरोपीला लवकर पकडून कडक शासन करावे, अशी मागणी आम्ही केली आहे.
- रामचंद्र घरत,
नगरसेवक, भाजपा
तुर्भे गावामध्ये बुधवारी रात्री मुलीची छेड काढण्याची घटना घडली आहे. याविषयी सर्व ग्रामस्थांनी पोलिसांना तत्काळ माहिती देवून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना आवश्यक सीसीटीव्हीचे चित्रीकरण उपलब्ध करून देण्यासाठीही सहकार्य केले असून आरोपीला लवकर पकडावे अशी मागणी केली आहे.
- निशांत भोलानाथ पाटील,
पदाधिकारी, राष्ट्रवादी काँगे्रस