तुर्भे एमआयडीसीच्या कंपनीला आग, तब्बल ५८ कामगार थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 08:19 AM2023-02-16T08:19:38+5:302023-02-16T08:20:00+5:30
आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ, वाशी, कोपरखैरणे येथील अग्निशमन दलासह एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीमधील कापड कंपनीला आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. ही घटना वेळीच लक्षात आल्याने कंपनीतील ५८ कामगार लगेचच कंपनीबाहेर धावले, त्यामुळे ते थोडक्यात बचावले. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या व एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, रात्री उशिरा आग नियंत्रणात आल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत कूलिंगचे काम सुरू होते.
आगीची माहिती मिळताच नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ, वाशी, कोपरखैरणे येथील अग्निशमन दलासह एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आगीमुळे इतर कंपन्यांना धोका असल्याने तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील कंपन्यांमधील कामगारांना बाहेर सुरक्षितस्थळी जाण्याची सूचना केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सांगितले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. कंपनीत कपड्याच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून दर्जेदार कपडा बनविण्याचे काम केले जाते. याच्या प्रक्रियेदरम्यान आग लागल्याची शक्यता आहे. आग आटोक्यात आल्यानंतर उशिरापर्यंत कूलिंगचे काम सुरू होते, असे अग्निशमन विभागाचे प्रमुख शिरीष आरदवाड यांनी सांगितले.