नवी मुंबई : रिअॅक्टरमध्ये स्पार्क होऊन कंपनीला आग लागल्याची घटना तुर्भे एमआयडीसीमध्ये घडली. कंपनीत अति ज्वलनशील रसायन असल्यामुळे आगीमुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. तत्पूर्वी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने संभाव्य हानी टळली.रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तुर्भे एमआयडीसीमधील प्रीसीज कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली. कंपनीत एपीआय व हॅक्झॉन या दोन रसायनांवर रिअॅक्टरमध्ये प्रक्रिया सुरू होती. या दरम्यान स्पार्क झाल्याने आग लागून ती कंपनीत पसरली. आग लागल्याचे समजताच कंपनीतील कामगारांनी बाहेर पळ काढला. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व पालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. कंपनीत अति ज्वलनशील रसायन असल्यामुळे आग भडकल्यास परिसरातील इतरही कंपन्यांना धोका निर्माण झाला होता; परंतु कंपनी पूर्णपणे काचेने बंदिस्त असल्यामुळे आग विझवण्याच्या कामात अग्निशमन दलाला अडथळा निर्माण झाला होता. अखेर दर्शनी भागातील काही काचा फोडून त्यामधून फोम व पाण्याचा मारा करून आग विझवण्यात आली. तत्पूर्वी पोलिसांनीही खबरदारी म्हणून परिसरातील वाहतूक बंद करून शेजारच्या कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र, वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. याच परिसरातील मोडेप्रो कंपनीला दोन महिन्यांपूर्वी रविवारच्या दिवशीच आग लागल्याची घटना घडली होती.सुट्टीच्या दिवशी कंपनीत तज्ज्ञ कामगार नसतानाही रिअॅक्टर सुरू ठेवले जात असल्याने आगीच्या घटना घडत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तुर्भे एमआयडीसीत कंपनीला आग, रिअॅक्टरमध्ये स्पार्क झाल्याने घडली दुर्घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:38 AM