तुर्भे एमआयडीसीमध्ये तिहेरी हत्याकांड, लुटीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 05:00 AM2019-07-14T05:00:51+5:302019-07-14T05:00:56+5:30
तुर्भे एमआयडीसी येथील भंगाराच्या गोडाऊनमधील तिघा कामगारांच्या हत्येची घटना घडली आहे.
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथील भंगाराच्या गोडाऊनमधील तिघा कामगारांच्या हत्येची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला असता, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हातोड्याने तसेच धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या झाली असून, लुटीच्या उद्देशाने हे हत्याकांड घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
तुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी भागात हा प्रकार घडला आहे. तिथल्या अब्दुल स्क्रॅब ट्रेडर्स या भंगाराच्या गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या तिघा कामगारांची हत्या झाली आहे. राजेश पाल (३०), नौशाद खान (१९) व व इर्शाद खान (१९) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी नौशाद व इर्शाद हे भाऊ आहेत.
राजेश, नौशाद, इर्शाद हे तिघेही झोपेत असताना त्यांच्यावर हल्ला करून हत्या झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तर यामध्ये एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या सहभागाचीही शक्यता नाकारता येत नाही.
शनिवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास सदर भंगाराच्या गोडाऊनचे मालक नसीम हे त्या ठिकाणी आले असता, कामगारांच्या राहण्याच्या जागेत तिघांचेही मृतदेह आढळून आले. हातोड्याने व कोयत्याने वार करून त्यांची हत्या केल्यानंतर मृतदेह तिथल्या खाटेखाली ठेवण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी गोडाऊनच्या गल्ल्यातील काही रक्कमही चोरीला गेल्याचे समोर आले. त्यावरून तिघांची हत्या लुटीच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, गुन्हेगारांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई यांनी सांगितले.
>रहिवाशांनी केली होती तक्रार
तिहेरी हत्याकांडाच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सदर परिसरात मोकळ्या मैदानामध्ये अनधिकृत भंगाराचे गोडाऊन चालवले जात आहे. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा परिसरात वावर वाढत आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेकदा संबंधित प्रशासनांकडे तक्रारही केलेली आहे. पण त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.