नवी मुंबई : एपीएमसीजवळील तुर्भे रेल्वे यार्डमधील समस्यांकडे खासदार राजन विचारे यांनीही पाठ फिरविली आहे. पाऊस सुरू झाल्यापासून येथील व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. प्लॅटफॉर्मवर गळती सुरू असल्याने व्यावसायिकांनी धान्य मागविणे बंद केले आहे. ठाणे मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी मागील आठवड्यात नवी मुंबईमधील रेल्वे स्थानकांची पाहणी केली. निवडून आल्यापासून प्रत्येक सहा महिन्यांनी ते रेल्वे स्टेशनचा दौरा आयोजित करतात. तेथील प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देतात. परंतु दीड वर्षामध्ये अद्याप महत्त्वाच्या समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. तुर्भे रेल्वे यार्डमध्ये सर्वात गंभीर समस्या आहेत. येथील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यांचा अंदाज न आल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. मोटारसायकलवरून नवीन व्यक्ती आतमध्ये आली तर खड्ड्यामुळे अपघात होत आहेत. प्लॅटफॉर्मवर गळती सुरू असल्याने व्यापाऱ्यांनी माल मागविणे बंद केले आहे. सिमेंटच्या गोणी भिजू नयेत, यासाठी त्यावर प्लास्टिकचे कागद बसविण्यात आले आहेत. या ठिकाणी रेशनवरील गहू व तांदूळ येत असतो. परंतु पावसामध्ये भिजून नुकसान होण्याची शक्यता असल्याने हा माल येणे बंद झाले आहे. येथील व्यवहार ठप्प होऊ लागले आहेत. माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम होऊ लागला आहे. माथाडी संघटनेचे नेते रेल्वे प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहेत, परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. रेल्वे स्टेशन व पोष्ट कार्यालयाच्या दौऱ्यावेळी खासदारांना याविषयी विचारणा केली असता, याविषयी माहिती घेतली जाईल, एवढेच उत्तर देण्यात आले. परंतु प्रत्यक्ष दौऱ्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी जाणे टाळले. यामुळे खासदार प्रश्न सोडविण्यासाठी रेल्वे स्टेशनचा दौरा करतात की फक्त दिखाव्यासाठी गर्दी असलेल्या रेल्वे स्टेशमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी दौरे करतात, असा प्रश्न रेल्वे यार्डमधील कामगार उपस्थित करीत आहेत. (प्रतिनिधी)रेल्वे यार्डच्या समस्यांवर लोकसभेमध्ये आवाज उठविण्यात यावा, अशी अपेक्षा कामगार व्यक्त करीत आहेत. परंतु ठाणे मतदारसंघाच्या एकही खासदाराने अद्याप या यार्डला भेट दिलेली नाही. राजन विचारे येथील समस्या सोडवतील, अशी अपेक्षा सर्वांना वाटत होती. परंतु निवडून झाल्यानंतर त्यांनाही अद्याप वेळ भेटलेला नाही. त्यामुळे रेल्वे यार्डमधील कर्मचारी सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत.
तुर्भे रेल्वे यार्ड समस्यांनी ग्रस्त
By admin | Published: July 11, 2016 2:35 AM