मुद्रे बुद्रुकमधील ट्रान्सफार्मर सुुरू
By admin | Published: January 13, 2017 06:14 AM2017-01-13T06:14:06+5:302017-01-13T06:14:06+5:30
नगरपरिषद क्षेत्रातील मुद्रे बुद्रुक गावामध्ये विजेचा दाब कमी असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या क्षमतेचा
कर्जत : नगरपरिषद क्षेत्रातील मुद्रे बुद्रुक गावामध्ये विजेचा दाब कमी असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या क्षमतेचा नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी पाठपुरावा केला. वीज वितरण कंपनीने गणेशोत्सवापूर्वी गावात ट्रान्सफार्मर बसविला; परंतु तो अद्याप सुरू करण्यात आला नाही. याबद्दल गावातील काही ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीतील अधिकारी वर्गाशी संपर्क साधला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. उलट समाधानकारक उत्तरे न दिल्याने यामध्ये काय ‘अर्थ’ दडलाय काय? याची चर्चा गावात होत होती. मात्र, ‘लोकमत’ने या बाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तातडीने ट्रान्सफार्मर सुरू करण्यात आला.
मुद्रे बुद्रुक परिसराचा विकास झपाट्याने झाल्याने त्या भागातील लोकसंख्या अल्पावधीतच पाच-सहापट झाली; परंतु वीजपुरवठा करणारा गावाबाहेर एकच ट्रान्सफार्मर असल्याने कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने स्थानिक नगरसेवक संतोष पाटील, विद्याधर सोनावणे, अरु ण नाखरेकर, गजानन बडेकर आदी ग्रामस्थांनी नवीन ट्रान्सफार्मर बाबत पाठपुरावा केला. त्याला यश येऊन गणेशोत्सवापूर्वी गावाच्या दुसऱ्या टोकाला ट्रान्सफार्मर उभाही राहिला. आता सणासुदीला वीजपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होणार नाही या आनंदात ग्रामस्थ होते; परंतु गणेशोत्सवानंतर दिवाळीपर्यंतचे सर्वच सण पार पडले; परंतु ट्रान्सफार्मर सुरू करण्यात आला नाही. या ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीशी संपर्ककरून अधिकारी व संबंधित कर्मचार्ऱ्यांशी चर्चा केली; परंतु त्यांना आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही. असंख्य कारणे देऊन शिष्टमंडळाची बोळवण केली. त्यामुळे येत्या नव्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत ट्रान्सफार्मर सुरू केला नाही तर आंदोलन छेडल्या वाचून पर्याय नाही, असे या ग्रामस्थांनी सूचित केले होते.
याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच ट्रान्सफार्मर सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र, मध्ये येणारे झाड कुणी तोडायचे? यावर चालढकल सुरू झाली.ग्रामस्थांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्यानंतर उपअभियंता बी. एस. वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता वाय. ई. साबळे, टेक्निशियन एस. एस. माने यांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ट्रान्सफार्मर सुरू केला. (वार्ताहर)