- नामदेव मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर अनधिकृतपणे कांदा, बटाट्याचा व्यापार सुरू झाला आहे. जवळपास २६ विक्रेते ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालाची विक्री करत आहेत. खुलेआम सुरू असलेल्या अनधिकृत व्यापाराकडे बाजार समिती, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून अभय देण्यासाठी प्रत्येक विक्रेत्याकडून महिन्याला ६ हजार रुपये वसूल केले जात आहेत. शासनाने भाजीपाला व फळे नियमनामधून मुक्त केल्याचा गैरफायदा अवैधपणे व्यवसाय करणाऱ्यांनी घेतला आहे. नियमनमुक्तीपासून जवळपास २६ व्यापाऱ्यांनी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर व मुख्य मार्केटसह विस्तारित मार्केटच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या रोडवर ठाण मांडले आहे. येथे रोज तीन ते चार ट्रक कांदा, बटाटा खाली करून तेथेच विक्री केली जात आहे. वास्तविक भाजी मार्केटमध्ये नियमाप्रमाणे दोन्हीही वस्तू विकता येत नाहीत. यामुळे प्रवेशद्वारावर हा व्यापार सुरू आहे. भाजी खरेदीसाठी आलेल्या मुंबई व उपनगरामधील विक्रेत्यांना कांदा खरेदीसाठी दुसऱ्या मार्केटमध्ये जावे लागत होते. आता प्रवेशद्वारावरच माल मिळत असल्याने भाजीबरोबर कांदा, बटाटाही खरेदी केला जात आहे. पूर्वी अशाप्रकारे कोणी प्रयत्न केल्यास एपीएमसी प्रशासन तत्काळ कारवाई करत होते. परंतु नियमनमुक्तीमुळे बाजार समितीचे अधिकारी संबंधितांवर काहीही कारवाई करत नाहीत. महापालिकेने यापूर्वी दोन वेळा येथील विक्रेत्यांचा माल जप्त केला व तडजोडी केल्यानंतर पुन्हा व्यवसायास मूक संमती दिली आहे. रोडवर एक वाहन उभे केले तरी तत्काळ कारवाई करणारे वाहतूक पोलीस रोडवर व्यवसाय थाटणाऱ्यांवर मात्र काहीच कारवाई करत नाहीत. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरील विक्रेते रोज सरासरी ५० लाख रुपयांच्या मालाची विक्री करत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या व्यवसायाला तीनही प्रमुख आस्थापनांकडून अभय मिळत आहे. बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा विभाग कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत आहे. परंतु वास्तविक हा पूर्ण परिसर बाजार समितीच्या अंतर्गतच आहे. बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच संरक्षण भिंतीला लागून हा व्यापार सुरू असून त्यावर स्वत: कारवाई करावी, तशी येत नसल्यास महापालिकेकडून कारवाई करून घेणे क्रमप्राप्त आहे. पण व्यापाऱ्यांनी सुरक्षा अधिकारी व बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना खूश ठेवल्याने कारवाईसाठी आग्रही भूमिका घेतली जात नाही. वाहतूक चौकीपासून काही मीटरवर हा प्रकार सुरू आहे. यामुळे रोज वाहतूक कोंडी सुरू आहे. परंतु त्यांनीही काहीही कारवाई न करण्याची भूमिका घेतली असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. अभय देण्यामागे अर्थकारण भाजी मार्केटच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या अवैध कांदा-बटाटा विक्रीतून रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. येथील जवळपास २६ विक्रेते बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा विभाग, वाहतूक पोलीस व महापालिकेच्या तुर्भे विभाग अधिकाऱ्यांना खूश करत आहेत. या विक्रेत्यांकडून महिन्याला प्रत्येकी सहा हजार रुपये वसूल केले जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यामुळेच तक्रारी करूनही कोणीही कारवाई करत नाही. प्रवेशद्वारावरील अवैध विक्रीमुळे निर्माण झालेल्या समस्या - प्रवेशद्वारावरील पदपथावर शेकडो गोणी उतरविल्या जात असल्याने पदपथ खचण्याची भीती- भाजी मार्केटमध्ये ये - जा करण्यास नागरिकांना अडचण- विस्तारित मार्केटमधील रोडवर विक्रेत्यांचे अतिक्रमण- माथाडी भवन ते अन्नपूर्णा चौकात रोज वाहतूककोंडी - कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापारावर होत आहे परिणाम - प्रवेशद्वारावरील अतिक्रमणामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
अनधिकृत व्यवसायातून ५० लाखांची उलाढाल
By admin | Published: May 18, 2017 4:23 AM