नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती शौचालय घोटाळाप्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने दोन कंत्राटदारांना अटक केली. सुरेश मारू आणि मनीष पाटील अशी या अटक केलेल्या कंत्राटदारांची नावे आहेत. या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली.
एपीएमसीतील शौचालय घोटाळाप्रकरणी यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह सात संचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जात आहे. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सुरेश मारू आणि मनीष पाटील या दोन कंत्राटदारांना अटक केल्याने घोटाळ्यातील आरोपींची संख्या १० वर पोहोचली आहे. अटक केलेल्या दोघांना शनिवारी न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. दरम्यान, शशिकांत शिंदे यांच्यासह उर्वरित सात आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.